छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’मध्ये काम करणारे अभिनेते आशीष रॉय हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केले होते. आता हॉस्पिटलचे बिल भरणे कठिण होत असल्यामुळे त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.
नुकताच आशीष यांनी स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हॉस्पिटलमधून घरी येण्याचे कारण सांगितले आहे. ‘मी घरी आलो आहे पण सध्या खूप अशक्तपणा जाणवत आहे. घरात एक काम करणारी व्यक्ती आहे जी माझी काळजी घेते. मी २४ मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला होता. कारण माझ्याकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासही पैसे उरले नव्हते. माझे २ लाख रुपये बिल झाले होत आणि ते भरणेही माझ्यासाठी कठिण झाले होते. आता मला दररोज डायलिसिससाठी तिन तासासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. जवळपास माझा दोन हजार रुपये खर्च होतो’ असे त्यांनी म्हटले होते.
या मुलाखतीमध्ये आशीष यांनी सलमान खानने केलेल्या मदती विषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी, ‘मी सलमानकडे मदत मागितली आहे. पण मला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. माझे बोलणे त्यांच्या पर्यंत पोहोचले आहे की नाही हे देखील मला माहिती नाही’ असे म्हटले.
आशिष रॉय यांना मूत्रपिंडासंदर्भातील आजार आहे. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.
आशीष रॉय यांनी अनेक छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपनी बात’,‘बा बहू और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘आरंभ’ यांसारख्या अनेक मालिकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 7:12 pm