१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस भारतीयांसाठी खास आहेत. या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अभिमानाची आणि समाधानाची भावना दिसून येते. त्यामुळे हा दिवसाचं महत्व काही औरच आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये या दिवशी देशभक्तीवर आधारित काही कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे अनेकांकडे या दिवसाच्या आठवणी असतील. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव यानेदेखील २६ जानेवारीची एक कॉलेजची आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

“प्रजासत्ताक दिन जवळ आला की मला कॉलेजमधील दिवस आठवू लागतात. मी डी.जी. रुपारेल महाविद्यालयाचा विद्यार्थी. कॉलेजमध्ये असताना मी एनसीसीमध्ये होतो. त्यामुळे सलग ३ वर्ष मी एनसीसीचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यातच २६ जानेवारी म्हटलं की, आमच्याकडे खास परेड व्हायची. महाराष्ट्र बटालियन असं आमच्या टीमचं नाव होतं”, असं मंदार म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “२६ जानेवारीच्या परेडसाठी साधारणपणे आम्ही दोन महिने आधीच तयारी सुरु करायचो. पहाटे लवकर उठून सराव करणं रोजचं झालं होतं. त्यावेळी जवळपास १५० मुलं मिळून आम्ही हा सराव करायचो. परेडसाठी हात-पायांच्या हालचालीमध्ये सुसूत्रता असणं खूप महत्त्वाचं असतं. याकडे आमचा विशेष कल असायचा. अगदी भूक-तहान विसरुन या सरावात आम्ही मग्न असायचो. जीवतोड मेहनतीनंतर प्रजासत्ताक दिनाचा दिवस नवं चैतन्य घेऊन यायचा. प्रजासत्ताक दिनी आमच्या हातात रायफल दिल्या जायच्या. एनसीसीचा गणवेश, हातातली रायफल आणि राष्ट्रध्वजाला सलामी देताना ऊर अभिमानाने भरुन यायचा. कॉलेजमधले ते दिवस भारावून टाकणारे होते. कॉलेजमध्ये घेतलेल्या या ट्रेनिंगचा मला माझ्या अभिनय क्षेत्रातही उपयोग होत आहे. मालिकेत फाईट सीन्स करताना याचा विशेष फायदा होतो”.

दरम्यान, मंदार जाधव हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे. सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या मालिकेचं शीर्षक गीत अनेकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.