गळ्यात नाग घेतलेल्या अवस्थेत कलाकारांचे ‘फोटोसेशन’; प्राणीमित्रांकडून तीव्र नाराजी

मुंबईतील फिल्मसिटीत नुकत्याच एका हत्तीणीचा चित्रीकरणादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता एका वाहिनीवरील मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्यातील कलाकारांनी चक्क नाग गळ्यात घालून आपली छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केली आहेत. त्यांच्या या कृतीमुळे प्राणीमित्रांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वनविभागाकडे केली असून त्यांनीदेखील गंभीर दखल घेत तपासास सुरुवात केली आहे. त्यामुळे गळ्यात जिवंत नागाचे वेटोळे घेऊन छायाचित्रे काढणाऱ्या कलाकारांना या नागामुळे फास बसण्याची पाळी आली आहे.

[jwplayer izOWW4O7]

जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी देशात कायदे असूनही अनेक जण या कायद्याला न भिता वन्यजिवांचा छळ सुरूच ठेवतात. त्यामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकार मुंबईत अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात घडले आहेत. फिल्मसिटी येथे नुकत्याच एका हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता येथेच ‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘नागार्जुन एक योद्धा’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्यातील कलाकारांनी नाग हातात धरून आपली छायाचित्रे ‘इन्स्टाग्राम’वरून प्रसारित केली. अभिनेत्री श्रुती उल्फत व अभिनेता निदा दिवेकर यांनी फणा उगारलेल्या नागाला हातात धरून ही छायाचित्रे काढली असून उल्फत यांनी थेट नागाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळून चित्रफीतही काढली आहे.

ही छायाचित्रे व चित्रफीत पाहून ‘पॉज’ या प्राणी मित्र संघटनेचे सुनिश कुंजू यांनी या कृत्याला हरकत घेत मुख्य वनसंरक्षक अधिकारी व जैवसंपदा विरोधी गुन्हे नियंत्रण विभागाकडे तक्रार केली आहे. नाग हा जंगली जैवसंपदा संरक्षण कायद्यान्वये दुसऱ्या प्रतीचा (शेडय़ुल्ड २) जंगली प्राणी आहे. या कायद्यान्वये त्याचा खेळ चित्रीकरणासाठी कोणी करू शकत नाही. मात्र याची तमा न बाळगता फिल्मसिटी येथे कलाकारांनी नागासोबत छायाचित्रे काढली होती. त्यांनी या चित्रीकरणासाठी नाग कोठून आणला? त्यांनी कायद्याची जराही भीती बाळगलेली दिसत नाही. तसेच मालिकेतून असा संदेश गेल्याने जंगली प्राण्यांचा खेळ करण्याच्या संकल्पनेचे उदात्तीकरण होते. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे, असे कुंजू यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चित्रीकरणासाठी गळ्यात नागाला घेऊन छायाचित्रे काढून समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या कलाकारांच्या हा प्रकार अंगलट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या मालिकेचे निर्माते यश पटनाईक यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नाग हा जंगली प्राणी असून त्याचा असा वापर करण्याची कायद्यानुसार परवानगी नाही. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान जिवंत नागाचा वापर चालू असल्याच्या तक्रारी एका प्राणी मित्र संस्थेने केल्या आहेत. त्यानुसार नागासोबत चित्रफीत काढण्यात आली त्या जागेची पाहणी करणार आहोत. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

– संतोष कंक, वनविभागाचे अधिकारी, मुंबई</strong>

[jwplayer 1yLms27W]