कलाविश्वात आतापर्यंत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. यातील काही महिलांनी MeToo मोहिमेअतंर्गत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडली. २०१८ मध्ये #MeToo या मोहिमेने चांगलाच जोर धरला होता. या मोहिमेअंतर्गंत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं कथन केलं. त्यामुळे या आरोपांमध्ये कलाविश्वातील काही दिग्गज नावंही समोर आली. त्यानंतर आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राजीव खंडेलवाल यानेदेखील त्याला मीटूचा अनुभव आल्याचं सांगितलं.

काही दिवसापूर्वी राजीवने ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या इन्स्टा लाइव्ह चॅटमध्ये त्याचा मीटूचा अनुभव शेअर केला. एका दिग्दर्शकाने त्याला चित्रपटाची ऑफर देत त्याच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितलं.

“मीटू अनुभवाविषयी सांगताना जेवढी भीती महिलांना वाटते. तेवढीच भीती पुरुषांनादेखील वाटते. मी कलाविश्वात नवीन होतं. त्यातच चित्रपटांमध्ये काम मिळावं यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. या काळात एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने मला चित्रपटात काम देतो असं सांगून त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्याचं ऑफिस त्याच्या घरातचं होतं. त्यामुळे मी त्याला भेटायला गेलो. ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने मला चित्रपटाच्या स्क्रीप्टऐवजी चित्रपटातलं गाणं ऐकून चित्रपटात काम करशील की नाही हे ठरवं असं सांगितलं. मात्र मी गाणं ऐकण्यास नकार दिला आणि मला स्क्रीप्ट हवं असल्याचं सांगितलं. माझ्या या वाक्यानंतर ते माझ्यावर चिडले”, असं राजीव म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “पहिल्या भेटीत त्यांचं वागणं पाहून काही तरी गडबड असल्याचं मला जाणवलं होतं.त्यामुळे दुसऱ्या मिटींगमध्ये जाताना मी थोडा खबरदारी बाळगून होतो. तसंच जर माझ्या जागी एखादी मुलगी असती तर तिच्यावर काय परिणाम झाला असता याचा मला अंदाज आला होता. या दुसऱ्या मिटींगमध्ये त्याने मला एका खोलीत येण्यास सांगितलं मात्र मी स्पष्टपणे नकार देत माझी गर्लफ्रेंड माझी वाट पाहत आहे असं सांगितलं. माझ्या या वाक्यानंतर त्यांने मला धमकी देण्यास सुरुवात केली. तू मालिकांमध्ये काम करणारा नवीन मुलगा आहेस, आणि तरीदेखील मला नाही म्हणतोस? त्याच्या या वाक्यानंतर मला परिस्थितीची पूर्ण कल्पना आली”.

दरम्यान, या दिग्दर्शकाने राजीवला दोन चित्रपटांच्या ऑफर्सही दिल्या होत्या. मात्र राजीवने या ऑफर्स धुडकावून लावल्या. राजीव खंडेलवाल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘कही तो होगा’, ‘क्या हादसा, क्या हकिकत’,’सी.आय.डी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर ‘आमिर’, ‘शैतान’ या चित्रपटांमध्येही झळकला आहे.