‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोहेना कुमारी हिचा सोमवारी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मोहेनासोबतच तिच्या कुटुंबीयांनाही करोनाची लागण झाली होती. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वत: याबाबत खुलासा केला.

“होय, ही बातमी खरी आहे. माझ्या कुटुंबातील सात जणांना करोनाची लागण झाली आहे. मात्र सर्वांची प्रकृती ठीक आहे. आम्ही सगळे रुग्णालयात आहोत. आम्हा सर्वांमध्ये सौम्य लक्षणे होती. वातावरणातील बदलामुळे कदाचित असं होतं असावं वाटलं होतं. माझ्या सासूला सर्वांत आधी करोनाची लागण झाली. मात्र त्यांनाही सौम्य लक्षणे असल्याने आम्हा कुणालाच कळलं नाही. आम्ही सर्वजण आता क्वारंटाइनमध्ये असून उपचार सुरु आहेत”, असं ती म्हणाली.

https://www.instagram.com/p/CA6K7hNDJ-Y/

यानंतर मोहेनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. ‘मी झोपू शकत नाहीये. माझ्या कुटुंबीयांसाठी हा फार कठीण काळ आहे. पण यातून लवकरच आम्ही बाहेर पडू अशी मी प्रार्थना करते’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

आणखी वाचा : वाजिद खान यांच्या आईला करोनाची लागण

मोहेनाने ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेची ऑफर मिळाली. मोहेनाने नुकतीच उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांचा मुलगा सुयेश रावत याच्याशी लग्नगाठ बांधली.