टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता गुरमीत चौधरी हा सुद्धा करोनाबाधितांची मदत करताना दिसून येतोय. नुकतंच त्याने नागपुरमध्ये करोनाबाधितांसाठी १००० बेड्स असलेले करोना रूग्णालय सुरू केले आहे. याशिवात तो करोना रूग्णांसाठी ऑक्सिजन, औषधांपासून ते प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळ्याच प्रकारची मदत देण्यासाठी धडपड करतोय. करोना सारख्या महामारीच्या काळात औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर अभिनेता गुरमीत चौधरी चांगलाच भडकला.

देशात सध्या करोनाची दुसरी लाट संपण्याचं नाव घेत नाही. याचे भयानक परिणाम समोर येत आहेत. करोनाने गेल्यावर्षी पेक्षाही जास्त थैमान यावर्षी घातलं आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांना मदतीची गरज पडत आहे. सध्या ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे लोक पुरता घाबरून गेले आहेत. तर दुसरीकडे करोनावर उपयुक्त ठरणाऱ्या औषधांचा आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतं असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना निस्वार्थ मदत करणारा अभिनेता गुरमीत चौधरीला सुद्धा या काळाबाजाराच्या अडचणीचा सामना करावा लागतोय. हे पाहून गुरमीत चांगलाच भडकला. त्याने त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केलाय.


महामारीच्या काळातही औषधांचा आणि ऑक्सिजनचा काळाबाजार सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून गुरमीतला करोनाबाधितांसाठी औषधं, ऑक्सिजन आणि प्लाझ्माची मदत करताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे गुरमीत चौधरी इतका चिडला की औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यांना जगण्याचाच हक्क नाही, असं रागाच्या भरात म्हटला. आणखी पुढे बोलताना गुरमीत म्हणाला, “मी स्वतः या अडचणीतून जातोय…लोक मला फोन करून सांगतात, माझ्या वडीलांना वाचवा, ते मरून जातील…परंतू या जगात असेही काही लोक आहेत जे स्वतःच्या कानाने हे सगळं ऐकतात, पण तरीही औषधांचा काळाबाजार करतात….”

यापुढे अभिनेता गुरमीत चौधरी म्हणाला, “करोना विषाणूपासून वाचण्यासाठी ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या जमा करून ठेवल्या जातात…अशा लोकांना जगण्याचाच हक्क नाही…ही लोक औषधं आणि ऑक्सिजन सारख्या उपयुक्त वस्तूंचा काळाबाजार करत आहेत….या वस्तू लोकांपर्यंत पोहोचूनच देत नाहीत…यांच्यावर मोठी कारवाई झाली पाहीजे…आता एक मोहिमच सुरू करण्याची वेळ आलीये…ज्यात जिथे कुठे काळाबाजार सुरू असेल तिथले फोटोज आणि व्हिडीओज काढून त्यांना रंगेहाथ पकडू शकतो.”

शेवटी अभिनेता गुरमीत म्हणाला, “ही सगळ्यात मोठी समस्या आणि याचा देशातील प्रत्येकजण सामना करतोय. आपण इच्छा असुनही काही करू शकत नाही, कारण गरजेच्या वेळी वस्तूच उपलब्ध होत नाहीत. यासाठी आपल्या सर्वांना ग्राऊंड लेव्हला काम करण्याची गरज आहे.”

अभिनेता गुरमीत चौधरी याने बॉलीवुड फिल्म ‘खामोशियां’ आणि ‘वजह तुम’ सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्यानंतर आता तो करोनाबाधितांच्या मदतीसाठी धडपड करत लोकांच्या मनात जागा निर्माण करत आहे.