‘ससुराल सिमर का’, ‘येस बॉस’, ‘बा, बहू और बेबी’ अशा नावाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेले अभिनेता आशिष रॉय गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, ‘मी डायलिसिसवर असून सध्या आर्थिक अडचणींना सामोरं जात असल्याचं’, एका पोस्टच्या माध्यमातून म्हटलं होतं. तसंच त्यांनी मदती करण्याचं आवाहनही केलं होतं. त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर कलाविश्वातील काही सेलिब्रिटी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहे.

आशिष रॉय यांनी रविवारी (१७ मे) फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी ‘मी अतिदक्षता विभागात (आयसीयू) असून मला डायलिसिसवर ठेवण्यात आलं आहे. माझ्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसून शक्य झाल्यास मला मदत करा’, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यांची ही पोस्ट पाहून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक हंसल मेहता हे मदतीसाठी पुढे आले आहेत.

हंसल मेहता यांनी ‘इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’चे (आयएफटीडीए) अध्यक्ष अशोक पंडित यांना टॅग करत आशिष रॉय यांची अडचण सांगितली. त्यानंतर हंसल मेहता यांचं ट्विट पाहिल्यावर अशोक पंडित यांनीही मदत करण्याचं आश्वासन देत आशिष रॉय यांच्या आजारपणाविषयीची अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर चित्रपट दिग्दर्शक बेजॉय नामबॅर यांनीही आशिष यांना मदत केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीदेखील आशिष रॉय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी लेखिका, दिग्दर्शिका विंता नंदा यांनी आशिष यांना आर्थिक मदत केली होती. आशिष रॉय छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपनी बात’, ‘ब्योमकेश बक्शी’, ‘येस बॉस’, ‘बा, बहू और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘आरंभ’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच ते व्हॉइस आर्टिस्टही आहेत. त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केलं आहे.