अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी आणि संपत्ती मिळविलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. उत्तम अभिनयशैलीप्रमाणेच बिग बी त्यांच्या लक्झरी लाइफ आणि संपत्तीमुळेदेखील चर्चेत येत असतात. जवळपास २०० चित्रपट करणारे बिग बी यांनी आजवर अमाप संपत्ती कमावली आहे. विशेष म्हणजे अफाट संपत्तीचे मालक असलेल्या बिग बींकडे एटीएम कार्ड नसल्याचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे. ‘केबीसी १२’च्या सेटवर त्यांनी हा खुलासा केला असून त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘कौन बनेगा करोडपती १२’च्या अलिकडेच झालेल्या भागात लक्ष्मी अंकुश राव या महिला स्पर्धकाने हजेरी लावली होती. या भागात लक्ष्मी यांनी १२ लाख ५० हजार रुपयाची रक्कम जिंकली. विशेष म्हणजे या भागात लक्ष्मी यांना अनेक रंजक प्रश्न विचारण्यात आले. यात बँक एटीएमविषयी प्रश्न विचारत असताना बिग बींनी त्यांच्याकडे एटीएम नसल्याचं सांगितलं.

“माझ्याकडे एटीएम कार्ड नाही. मला एटीएम मशीनमधून पैसे काढताना भीती वाटते. जर मशीनमध्ये कार्ड अडकलं आणि ते लवकर बाहेर आलंच नाही, तर लोकांना वाटायचं की आपण चोरी करतोय”, असं बिग बी म्हणाले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर सेटवर एकच हास्यकल्लोळ झाला.

आणखी वाचा- लग्नाआधी बिग बींनी लिहिले होते लव्ह लेटर, केबीसीमध्ये सांगितला किस्सा

दरम्यान, केबीसीच्या सेटवर बिग बींनी आतापर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मात्र, त्यांची संपत्ती आणि लक्झरी लाइफस्टाइल कायमच चर्चेत असते. अलिकडेच झालेल्या एका पर्वात त्यांनी त्यांची संपत्ती मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता यांच्या नावावर करणार असल्याचं सांगितलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बींची एकंदरीत संपत्ती ३६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यासोबत त्यांचे ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ हे दोन बंगले असून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्श, लेक्सस, फॅन्टम अशा अनेक गाड्या आहेत.