‘खतरों के खिलाड़ी 11’च्या शूटसाठी सेलिब्रिटी स्पर्धक केपटाउनमध्ये पोहोचले आहेत. अशातच एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार करोनामुळे या शोच्या एकूण कालावधीला ग्रहण लागलंय. २२ जूनपर्यंत या शोमधली संपूर्ण टीम भारतात परतणार होती, असं बोललं जातं होतं. परंतू करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कठोर नियमांमुळे या शोमधील संपूर्ण टीमच्या प्लॅनवर पाणी फिरलंय. या शोमधील संपूर्ण टीमला आता लवकरात लवकर भारतात येण्याचे आदेश देण्यात आलेत.

१२ एपिसोडनंतर बंद होणार हा शो?
केपटाउनमध्ये गेलेली या शोची सर्व टीम येत्या जूनमध्ये भारतात परतणार होती आणि यासाठीचे सर्वांचे तिकीट देखील बुक करण्यात आले होते. पण देशभरात करोनाचा वाढता हाहाकार पाहता ‘खतरों के खिलाड़ी 11’ ची शूटिंग लवकरात लवकर संपवून भारतात परतण्याचा निर्णय या शोच्या मेकर्सनी घेतलाय. म्हणूनच ‘खतरों के खिलाड़ी 11’ हा शो एकूण १२ एपिसोड झाल्यानंतर बंद केला जाणार आहे. केपटाउनमधली शूटिंग पूर्ण करून सगळी टीम येत्या महिन्याभरात पुन्हा भारतात येणार आहे.

दर्शकांची होणार निराशा
अद्याप तरी याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थातच जर असं झालं तर शोच्या मेकर्सचं नुकसान आणि दर्शकांची निराशा होणार हे मात्र नक्की. गेल्या ६ मे ला या शोमधली सगळी टीम मुंबईहून केपटाउनसाठी रवाना झाली होती. यावेळी स्पर्धकांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं.

‘खतरों के खिलाड़ी 11’ मध्ये दिसणार हे सेलिब्रिटी
‘खतरों के खिलाड़ी 11’ मध्ये राहुल वैद्य, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, सना मकबूल, विशाल आदित्य सिंह, अभिनव शुक्ला, आस्था गिल आणि निक्की तंबोळी सारखे सेलिब्रिटीज स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. यातील काही सेलिब्रिटी हा शो सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आले आहेत. निक्की तांबोळीने करोनामुळे आपल्या भावाला गमावलं. तर दुसरीकडे श्वेता तिवारी तिचा पती अभिनव कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आली आहे.