छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथियाँ’ ही मालिका आजही अनेकांच्या लक्षात असेल. या मालिकेतील गोपी बहू आणि कोकिलाबेन हे दोन पात्रं तुफान गाजले. विशेष म्हणजे या मालिकेने केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर संगीतकारांनादेखील भुरळ घातल्याचं पाहायला मिळालं. अलिकडेच यशराज मुखाते या संगीतकाराने कोकिलाबेनच्या संभाषणावर एक रॅप साँग तयार केलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत असून त्यावर खुद्द कोकिलाबेनने म्हणजेच अभिनेत्री रुपल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रसोडे में कौन था? तुम थी? मैं थी? ये थी? कौन था?…राशि बेन!! असे या रॅप साँगचे बोल आहेत. विशेष म्हणजे हे गाणं कोकिलाबेन आणि गोपी बहु यांच्या संवादावरुन तयार करण्यात आलं आहे.

“माझ्या संवादावरुन एक गाणं तयार झालं आहे असं माझ्या वहिनीने मला सांगितलं होतं. त्यानंतर माझी सहकलाकार रिया शर्माने मला या गाण्याचा व्हिडीओ पाठवला. हा व्हिडीओ पाहून मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला. यशराजला ही क्लिप कुठे मिळाली असा प्रश्न मला पडला. कारण मी असं गाणं कधीच गायले नव्हते. नंतर माझ्या लक्षात आलं की, माझ्या संवादावरुनच त्याने हे गाणं तयार केलं आहे. त्यानंतर मी माझ्या मित्रपरिवाराकडून त्याचा नंबर मिळवला आणि त्याला फोन करुन त्याचे आभार मानले”, असं रुपल म्हणाल्या.

दरम्यान, कोकिलाबेन ही भूमिका रुपल यांच्यासाठी करिअरमधील मैलाचा दगड ठरली आहे असंही त्यांनी बोलताना सांगितलं. यशराजने तयार केलेलं हे गाणं ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेतील एका सीनवर आधारित आहे. या सीनमध्ये कोकिलाबेन आपल्या सूनेला अर्थात गोपी बहुला जाब विचारत आहे.  संभाषणादरम्यान या दोन व्यक्तिरेखा जे शब्द उच्चारतात त्यावर हे रॅप साँग तयार करण्यात आलं आहे.

‘साथ निभाना साथियाँ’ ही स्टार प्लस वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील अनेक दृश्यांवर आजवर मीम्स व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यशराजने तयार केलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.