भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या यांचा जीवनप्रवास दाखवणारी नवी मालिका सुरू होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने वाहिनीने मालिकेची निर्मिती केली आहे.

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी पु.लं देशपांडे यांची भूमिका सागरनं साकारली होती. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय असं म्हणत सागरनं आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तुत्व खरंच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने बाबासाहेब उलगडत आहेत.’ असंही सागर म्हणाला.

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचं हे महानकार्य मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न या मालिकेतून होणार आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास मालिकेत पाहायला मिळणार आहे. टीव्ही हे अत्यंत प्रभावशील माध्यम असल्यामुळे प्रत्येक जनमानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजला जाईल’ असा विश्वास स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच प्रेरणादायी जीवनपट मालिकेच्या रुपाने १५ एप्रिलपासून रात्री ९.०० वाजता स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.