News Flash

मालिका आणि चित्रपटांतील कलाकारांचे ग्लॅमर नाटकांना!

मराठीमध्ये एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मनोरंजन वाहिन्या असल्या तरी या सर्व वाहिन्यांमुळे मराठी कलाकारांना त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे.

| August 23, 2015 01:49 am

काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर नाव मिळाले की मराठी कलाकार चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांकडे आपला मोहरा वळवत असत. आता मालिकांमधील लोकप्रिय चेहरे रंगभूमीवर काही नव्या तर काही पुनरुज्जीवित नाटकांच्या माध्यमातून पुन्हा रंगभूमीकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. काही कलाकार चित्रपट व मालिकांमध्ये व्यग्र असले तरी रंगभूमीसाठी वेळात वेळ काढून ते नाटकाचे प्रयोग करत आहेत. मराठी मालिका आणि चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांचे ‘ग्लॅमर’ मराठी नाटकांना लाभल्यामुळे सध्या प्रयोगांना प्रेक्षक प्रतिसादही वाढतो आहे…

मराठीमध्ये एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मनोरंजन वाहिन्या असल्या तरी या सर्व वाहिन्यांमुळे मराठी कलाकारांना त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे. या वाहिन्यांवरील विविध मालिका किंवा रिअ‍ॅलिटी शोमधून अनेक दिग्गज कलाकारांसह नव्या कलाकारांनाही संधी मिळाली आहे. मनोरंजन वाहिन्यांवरील दैनंदिन मालिकांमधून हे कलाकार घराघरांमध्ये पोहोचतात. मालिकेतील कलाकाराची एखादी भूमिका इतकी लोकप्रिय होते की तो कलाकार मालिकेतील ‘त्या’ नावानेच ओळखला जातो. मालिकेतील कलाकारांच्या या लोकप्रियतेचा फायदा नाटकाला करून घेण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. परिणामी कलाकारांच्या रंगभूमीवर काम करण्याच्या इच्छेतून मालिकांमधील अनेक चेहरे रंगभूमीवर दिसायला लागले आहेत. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर सध्या किमान दहा ते बारा अशी नाटके सुरू आहेतकी त्यात विविध मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये काम करत असलेले अनेक कलाकार काम करत आहेत. दूरचित्रवाहिन्यांच्या छोटय़ा पडद्यावर दिसणारे हे कलाकार रंगभूमीवर प्रत्यक्ष पाहायला मिळत असल्याने त्यांच्या ‘ग्लॅमर’चा फायदा आपोआप नाटकांनाही मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर नाव मिळाले की कलाकार चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांकडे वळत असत. आता मालिकांमधील लोकप्रिय चेहरे रंगभूमीवर काही नव्या तर काही पुनरुज्जीवित नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीकडे वळताना दिसत आहेत. अर्थात काही कलाकार आवर्जून मालिकांमधून काम करीत असले तरीही वेळात वेळ काढून रंगभूमीवर नाटक करत आहेत. मालिकेतील त्या कलाकारांच्या ‘भूमिके’चा उल्लेख करून नाटकांची जाहिरातही केली जात आहे. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील आशा शेलार यांचे. आशा शेलार या मालिकेत ‘जान्हवीची आई’ म्हणून लोकप्रिय झाल्या आहेत. त्या काम करत असलेले ‘ग्रेसफूल’ हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. याच मालिकेतील ‘श्री’ (शशांत केतकर), ‘जान्हवीचा मामा’ (जनार्दन लवंगारे) आणि ‘जान्हवी’ (तेजश्री प्रधान) यांचीही नाटके रंगभूमीवर आली (शशांक केतकर, तेजश्री प्रधान यांची नाटकेअजूनही सुरू आहेत) तेव्हाही वेगवेगळ्या वेळी व जाहिरातीत मालिकेतील ‘श्री’, ‘जान्हवीचा मामा’ आणि ‘जान्हवी’ आता नाटकात अशी जाहिरात करण्यात आली होती.
‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील ‘श्री’ अर्थात शशांक केतकर आणि याच मालिकेतील ‘छोटी आई’ अर्थात लीना भागवत यांचे ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक रंगभूमीवर सध्या जोरात सुरू आहे. मालिकेतील ‘श्री’ व ‘छोटय़ा आई’ला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी नाटकाला चांगली गर्दी होत आहे. याच मालिकेतील ‘मनीष’ (सचिन देशपांडे) आणि ‘गीता’ (राधिका देशपांडे) यांचेही नवे नाटक ‘ती दोघं’ ही रंगभूमीवर नुकतेच दाखल झाले आहे. ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाद्वारे ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील ‘जान्हवी’ने रंगभूमीवर पदार्पण केले. ‘जरा हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचे ‘जस्ट हलकं फुलकं’ रंगभूमीवर जोरात सुरू आहे.
मालिकांप्रमाणेच मराठी चित्रपट व काही नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे अभिनेते विद्याधर जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या ‘लव्ह बर्ड्स’ या नाटकाचे प्रयोग सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. या नाटकासाठी मुक्ता बर्वे ‘निर्माती’ची भूमिकाही पार पाडत आहे. ‘का रे दुरावा’मधले ‘केतकर काका’ अर्थात अभिनेते अरुण नलावडे यांचे ‘श्री बाई समर्थ’ नाटक सुरू झाले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील ‘नाना’ म्हणजेच डॉ. गिरीश ओक यांच्या ‘कहानी मे ट्विस्ट’चे प्रयोगही सुरू आहेत. ‘तू तिथं मी’मधील ‘सत्या’ आणि आता ‘तू माझा सांगाती’मधील ‘तुकाराम’ अर्थात अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’मधील अभिनेत्री स्पृहा जोशी यांचे ‘समुद्र’ हे नाटक लोकप्रिय आहे. नकुल घाणेकर (जय मल्हार) तसेच अभिनेता विक्रम गायकवाड यांनीही ‘इंदिरा’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर प्रवेश केला आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका व चित्रपटातील प्रतीक्षा लोणकर आणि ऐश्वर्या नारकर या दोघींची प्रमुख भूमिका असलेले ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ हे नाटक काही महिन्यांपूर्वी रंगभूमीवर आले होते. विविध मालिकांमधून प्रेक्षकांना परिचित झालेले अभिनेते अशोक िशदे यांनीही दीर्घ कालावधीनंतर ‘प्रेम, प्रेम असतं’ या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिके तील स्वप्निल जोशी हा लोकप्रिय अभिनेता असूनही मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या व्यग्र वेळापत्रकातूनही तो ‘गेट वेल सून’चे प्रयोग करतो आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मालिकेतील कलाकार नाटकांकडे वळतायेत. त्यामागे त्यांना मालिकेमुळे मिळालेली लोकप्रियता हे मोठे कारण आहे. कलाकार एकदा मालिकेतील नावांनी लोकप्रिय झाला की तीच त्यांची नवी ओळख बनून जाते. आणि मग याच त्यांच्या घराघरात असलेल्या ओळखीच्या नावांचा फायदा सध्या नाटकांच्या प्रयोगांसाठी करून घेतला जात आहे. त्यामुळे शशांक केतकरचे नाटक यापेक्षाही ‘श्री त्या नाटकात किती छान काम करतो नाही..’ याचीच चर्चा जास्त रंगते.
मालिका आणि चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांना प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहणे, नाटकाच्या प्रयोगानंतर त्यांच्याशी थेट संवाद साधायला मिळणे, त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढता येणे याचे आजच्या तरुण पिढीत तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष आकर्षण आहे. त्यामुळे या लोकप्रिय चेहऱ्यांना पाहण्याच्या निमित्ताने का होईना ही नवी पिढी नाटकाच्या प्रयोगांना गर्दी करत असल्याचे दिसून येते आहे. कलाकारांच्या या छोटय़ा पडद्यावरील ग्लॅमरमुळे का होईना तरुण पिढी नाटकांकडे वळली असून त्यांना नाटकाविषयी आवड निर्माण होते आहे ही मराठी नाटकांसाठी नक्कीच आनंदाची बाब असल्याचे नाटय़ वर्तुळात बोलले जात आहे.

मालिका/चित्रपटातील लोकप्रिय चेहरे ज्या नाटकांमध्ये आहेत आणि ज्या नाटकांना चांगले बुकिंग व प्रेक्षक प्रतिसाद मिळतोय ती नाटके अशी
’ गोष्ट तशी गमतीची,
’ वाडा चिरेबंदी,
’ लव्ह बर्ड्स,
’ कार्टी काळजात घुसली,
’ श्री बाई समर्थ,
’ करुन गेलो गाव
’ समुद्र,
’ जस्ट हलकं फुलकं

ग्लॅमरचा फायदा कलाकारांनाही होतो
मालिकेतून लोकप्रिय झालेले चेहरे आणि कलाकार प्रत्यक्ष कसे दिसतात, बोलतात याची प्रेक्षकांना उत्सूकता असते. त्यामुळे नाटकाच्या सुरुवातीच्या प्रयोगांना या ‘ग्लॅमर’चा फायदा नक्कीच होतो. पण, नाटकाचे काही प्रयोग झाल्यानंतर मात्र मालिकेतील लोकप्रियतेपेक्षा नाटकाची संहिता, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय यावर नाटकाचे यश अवलंबून असते. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत काम करत असलो तरी मला नाटक करायचेच होते. कारण, मालिका व रंगभूमी या दोन्हीकडची अभिनयाची परिभाषा वेगळी आहे. आमच्या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि संपूर्ण चमूच्या सहकार्यामुळेच मी हे नाटक करू शकत आहे. ‘ती दोघं’मध्ये आजच्या तरुण पिढीचा, आजच्या पिढीतील नवरा व बायकोचा विषय मांडण्यात आला असून संपूर्ण कुटुंबासह हे नाटक पाहता येईल असे आहे.
सचिन देशपांडे, अभिनेता

म्हणूनच तर तरुण प्रेक्षक नाटकाकडे वळला
मालिका किंवा चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांच्या ‘ग्लॅमर’चा फायदा काही प्रमाणात नाटकांना मिळायला सुरुवात झाली आहे. १७ ते २५ वयोगटातील तरुण प्रेक्षक नाटकाकडे वळायला लागला आहे. कलाकारांच्या या ग्लॅमरचा फायदा मराठी नाटकांना मिळत असेल तर ती आनंदाची बाब आहे.
प्रियदर्शन जाधव, अभिनेता व दिग्दर्शक

जास्त फायदा मुंबईबाहेर
मालिका किंवा चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांच्या ‘ग्लॅमर’चा नाटकाला फायदा मुंबईत काही प्रमाणात होतो. मात्र याचा सर्वात जास्त फायदा मुंबईबाहेर अर्थात बाहेरगावी निर्मात्यांना जास्त प्रमाणात होतो. मालिका किंवा चित्रपटातील लोकप्रिय चेहऱ्यांना प्रत्यक्ष पाहणे, नाटक संपल्यानंतर त्यांच्याशी बोलता येते. शिवाय, त्यांच्या कामाबद्दलचे कौतूक त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगता येते. यामुळे बाहरेगावी प्रेक्षक अनेकदा मालिकेतील किंवा चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांच्या नाटकांना विशेष गर्दी करताना दिसतात.
हरी पाटणकर, ज्येष्ठ बुकिंग क्लार्क

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2015 1:49 am

Web Title: tv serial theaters artist like stage
टॅग : Stage
Next Stories
1 जसा आहे तसंच त्यावर प्रेम करा – रमेश सिप्पी
2 वेलकम बॅक
3 बोलावा विठ्ठल : दिल्लीत श्री विठ्ठलाची स्वर-पूजा!
Just Now!
X