|| भक्ती परब

आम्ही ऑन लाइन मालिका बघतो. काय तुम्ही त्या सासूसुनांच्या मालिका बघता. अतार्किक काहीतरी दाखवलं जातं. आम्ही कसा जागतिक दर्जाचा आशय पाहतो आणि तुम्ही ते घिसंपिटं काहीतरी पाहत राहता. गेल्या वर्षांच्या शेवटाकडे येताना हळूहळू ओटीटी पाहणारा प्रेक्षक आणि टीव्ही पाहणारा प्रेक्षक अशी विभागणी व्हायला सुरुवात झाली होती. आता ही विभागणी ठळकपणे दिसू लागली आहे. त्यामुळे एकमेकांना भेटल्यावर गप्पाही अशाच रंगतात. ‘ब्लॅक मिरर’, ‘बिग लिटील लाय’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’, ‘मेड इन हेवन’ अशा काही सीरिजची नावं घेऊ न पाहिलंस का, असं विचारलं जातं. ‘गॉट फॅन्स’चा नखरा तर याहून वेगळा आहे. मग टीव्हीवाला प्रेक्षक ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये है मोहब्बते’पासून सुरुवात करून ‘तुला पाहते रे’ मालिकेपर्यंत वेगवेगळी नावं घेतो आणि विचारतो, तू पाहतोस का? चल हे काय बघण्यासारखं आहे का?, अशी प्रेक्षकांमध्ये ते सध्या काय पाहतात यावरून जुगलबंदी रंगू लागली आहे..

ओटीटी आणि टीव्ही पाहणाऱ्यांमधून तर अजून एक वेगळा वर्ग उदयाला आला आहे. हा वर्ग कुठल्याही टीव्ही मालिकांमधील एखादं व्हायरल झालेलं दृश्य बघतो आणि तेवढंच ते दृश्य समाजमाध्यमांवर शेअर करत त्याबरोबर लिहितो की बघा, किती हास्यास्पद गोष्टी मालिकांमध्ये दाखवल्या जातात. नुकतंच ‘कहा हम, कहा तुम’ या मालिकेत एक पत्नी आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये शिरते आणि पतीचे प्राण वाचवते, असं दृश्य दाखवण्यात आलं होतं. ते दृश्य बघून या मालिकेतील हृदयरोगतज्ज्ञाची भूमिका करणारा डॉ. रोहित सिप्पी चिडतो. खरंतर मालिकेच्या दृष्टिकोनातून हे अतिशयोक्तीपूर्ण आणि तितकंच विनोदी दृश्य म्हणून ते चित्रित झालं होतं. या दृश्याला त्या मालिकेच्या दृष्टिकोनातून एक वेगळा अर्थ होता. पण त्या दृश्याचा तेवढाच तुकडा व्हायरल झाल्याने सगळ्या नेटकऱ्यांनी ‘आरआयपी मेडिकल सायन्स’ अशी ‘हसणारे इमोजी’ टाकून कॅप्शन देत शेअर केले. कोणीही त्या दृश्याचा अर्थ समजून घेतला नाही. मग त्यानंतर टीव्ही मालिका कशा फालतू झाल्या आहेत, इथवर त्या चर्चेने टोक गाठले. मूळ मुद्दा समजून न घेता चर्चा करणारी अशी अनेक मंडळी आसपास असतात. त्यामुळे अनेकदा टीव्ही पाहणारा प्रेक्षक म्हणजे निर्बुद्धच आहे, असे त्यांना वाटते.

विशेष सांगायचं म्हणजे ‘स्टार प्लस’वर ‘कहा हम, कहा तुम’ मालिका १७ जूनपासून सुरू झाली, त्याच दिवशी ती ९७ टक्के प्रेक्षकांना आवडली, अशी गुगल सर्च इंजिनला नोंद झाली. तसेच आयएमडीबी ( इंटरनेट मुव्ही डेटाबेस) या साईटने तिला १० पैकी ९.१ इतके गुण दिले आहेत. जे आता सध्या वाहिन्यांवर सुरू असलेल्या कुठल्याच मालिकेला मिळालेले नाहीत.

‘कलर्स’ हिंदी वाहिनीवर दैनंदिन मालिकांची नुसती खिचडी झाली आहे. त्यामुळे वाहिनीवर सध्या ‘डान्स दिवाने’ या कथाबाह्य़ कार्यक्रमाचे दुसरे पर्व तेवढे पाहण्यालायक उरले आहे. साहजिकच हिंदीमध्ये दैनंदिन कार्यक्रमांची मक्तेदारी ‘झी टीव्ही’ आणि ‘स्टार प्लस’ वाहिनीकडे आली आहे.

‘झी मराठी’वरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिका येत्या दोन आठवडय़ांत वेगळं स्थान मिळवू शकेल. मालिकेत सुमी आणि समरची जोडी उत्तम आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेमध्ये झेंडे, विक्रांत, इशा आणि इशाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तिरेखा अशी जुगलबंदी रंगली आहे. ‘स्टार प्रवाह’वर ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका इतर पौराणिकांमध्ये उठून दिसते आहे. या मालिकेच्या मांडणीतलं वेगळेपणही जाणवतं. अत्री ऋषी आणि अनुसूयेचा विवाह झाल्यानंतरही त्या दोघांना अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते आहे. पुढे ते कसे यशस्वी होतील, हे येत्या काही भागांमध्ये पहायला मिळेल.

‘झी युवा’ वाहिनीवर मराठी भाषाप्रेमींसाठी शुद्ध मराठी भाषेतली ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही मालिका १५ जुलैपासून दाखल होत आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या अभिनयाने नटलेला ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट रविवारी पहायला मिळणार आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत बाळूमामा आणि सत्यवा यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर मालिकेला अजूनच एक रंजक वळण येणार आहे. ‘झी टीव्ही’वर ‘डान्स इंडिया डान्स’च्या सातव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यामध्ये नव्या स्पर्धकांची जेवढी उत्सुकता होती तेवढीच करिना कपूर खान स्पर्धकांचे परीक्षण कसे करते, त्यांच्याशी संवाद कसा साधते याबद्दलही होती. पहिल्याच भागापासून तिने प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. पण परीक्षक म्हणून तिला अजून कठोर व्हावं लागेल, असंही प्रेक्षकांचं म्हणणं आहे. प्रत्येक भागात करिनाची वेशभूषासुद्धा लक्ष वेधून घेते आहे.

‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर सुपरस्टार गली बॉय रॅपर डिव्हाइन म्हणजेच व्हिव्हियन फर्नाडिस याचा जीवनप्रवास पहायला मिळणार आहे. या वाहिनीवर ‘गली लाइफ : द स्टोरी ऑफ डिव्हाइन’ असे शीर्षक असलेला हा लघुपट १ जुलैला रात्री ९ वाजता पहायला मिळेल.

एकूणच दैनंदिन मालिका ते अप्रतिम लघुपट असे सुरेख मनोरंजन टीव्हीवाल्या प्रेक्षकांना या आठवडय़ात पाहायला मिळणार आहे. ‘कहा हम, कहा तुम’ मालिकेतील डॉ. रोहित जसा सोनाक्षी टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे तिला चिडवण्यासाठी सारखा सांगत असतो की आमच्या घरी कोणी टीव्ही पहात नाही. सगळे वेबसीरिज पाहतात. पण सोनाक्षी त्याला सडेतोड उत्तर येत्या काही भागांमध्ये देणार आहे. तसेच टीव्हीवाल्या प्रेक्षकांनीही ऑन लाइनवाल्या प्रेक्षकांना सडेतोड उत्तर द्यायला हरकत नाही. काहीही झालं तरी आम्ही टीव्हीवाले आहोत, असं त्यांना खास टीव्हीच्या शैलीत तीनदा मान वळवून सांगा, सांगाल ना..