लोकप्रिय अमेर‍िकन टीव्ही मालिका ‘फ्रेंड्स’ च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतील वेटर गंथरची भूमिका करणारे अभिनेता जेम्‍स मायकल टायलर यांना चौथ्या स्टेजचा कर्करोग झाला आहे. हा कर्करोग चौथ्या टप्प्यावर पोहोचला आहे. अभिनेता जेम्स यांनी स्वतः एका टीव्ही शोच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. ५९ वर्षीय जेम्स कर्करोगाचे उपचार घेत आहेत. पण या उपचारा दरम्यान ते खूपच अशक्त झालेले दिसून येत आहेत.

जेम्स यांना कर्करोगाने ग्रासल्याचं सप्टेंबर २००८ मध्ये कळलं. सोमवारी जेम्स यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ते एका व्हिल चेअरवर बसलेले दिसून येत आहेत. जेम्स यांचा हा फोटो त्यांच्यावरील केमोथेरपी सेशननंतरचा आहे.

कर्करोग झाल्याचं जेव्हा पहिल्यांदा कळलं…

आजाराबाबत सांगताना जेम्स म्हणाले, “मला अ‍ॅडव्हान्स प्रोस्टेट कॅंसरने ग्रासलं आहे…हा कॅंसर माझ्या हाडांपर्यंत पसरलाय…जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला हा आजार झाल्याचं कळलं, तेव्हा माझं वय ५६ वर्ष इतकं होतं…त्यानंतर लगेचच हार्मोन थेरपीने उपचाराला सुरवात केली.” यापुढे बोलताना जेम्स यांनी सांगितलं, “मी त्यावेळी ५६ वर्षाचा होतो, मी पीएसएसाठी स्क्रिनिंग केली जी प्रोस्टेट स्‍पेसेफिक एंटीजनची असते. त्यानंतर मला ब्लड टेस्ट करायला सांगितली. स्पष्ट दिसत होतं की काहीतरी गडबड आहे.”

करोना महामारी दरम्यान हाडांपर्यंत पोहोचला आजार

यापुढे बोलताना जेम्स म्हणाले, “सगळ्या टेस्टनंतर डॉक्टरांनी ताबडतोब मला फोन केला आणि मला दुसऱ्या दिवशी भेटायला सांगितलं. कारण माझ्या शरीरातील प्रोस्टेस्टबाबत काहीतरी गंभीर समस्या झाली आहे, अशी त्यांना शंका आली होती.” करोना महामारी दरम्यान जेम्स यांना एक टेस्ट करता आली नाही. त्यामूळे या आजाराने विक्राळ रूप धारण केलं आणि शरीरातील हाडांपर्यंत हा आजार पसरला. त्यामूळे आता त्यांना चालता-फिरता देखील येत नाही.

‘फ्रेंड्स रीयूनियन’मध्ये व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सामिल झाले

लोकप्रिय मालिका ‘फ्रेंड्स’मधील सर्वच कलाकार गेल्याच महिन्यात टीव्ही वरील ‘फ्रेंड्स रीयूनियन’ या शोमध्ये आले होते. ‘फ्रेंड्स’ मालिकेतील जेनिफर एनिस्टन, कर्टेनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी, डेविड शिमर हे सर्वच कलाकार या शोमध्ये एकत्र दिसून आले. मात्र या शोमध्ये जेम्स यांना येणं जमलं नाही. त्यामूळे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी या शोमध्ये सहभाग घेतला. ‘फ्रेंड्स’ मालिकेचे प्रोड्यूसर आणि त्यातील को-स्‍टार डेविड शिमर यांना सुद्धा जेम्स यांच्या आजाराबाबत आधीपासून माहिती होती.

जितक्या लवकर टेस्ट करतील तितक्या लवकर आजारातून बाहेर पडू

जेम्‍स मायकल टायलर पुढे म्हणाले, “या आजारातून बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. तुम्ही सुद्धा कधी प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलात तर तुमच्या पीएसए टेस्‍टसाठी सुद्धा एकदा डॉक्टरांना विचारून घ्या. त्यामूळे या आजाराबाबत आपल्याला लवकर कळू शकतं. जर हा आजार प्रोस्टेस्टच्या पुढे हाडापर्यंत येऊन पोहोचला तर याचा सामना करणं खूप अवघड जातं. हा चौथ्या स्टेजचा कॅंसर आहे. त्यामूळे हा आजार माझा जीव घेऊनच राहणार आहे. मी माझ्या पत्नीचं ऐकलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, हा आजार कुणाला झाला तर यातून बाहेर येण्याचे ९० टक्के चान्सेस असतात.”