पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी केव्हाच सुरु झाली आहे. सत्ताधारी तृणमुल काँग्रेस आणि भाजपामध्ये यंदा मुख्य लढत होणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगलेला आहे. त्याचवेळी प्रचाराला ग्लॅमरचा तडका देण्यासाठी दोन्ही पक्ष बंगाल चित्रपट सृष्टीतील नामवंत चेहऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

यश दासगुप्ता या कलाकाराने अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केला. यशच्या आधीसुद्धा अन्य कलाकारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुढच्या काही दिवसात आणखी कलाकार भाजपात प्रवेश करु शकतात. पण यश दासगुप्ताच्या भाजपा प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या बरोबर यश दासगुप्ताचे नाव जोडले जात आहे.

नुसरत जहाँ यांचा २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैन बरोबर विवाह झाला. पण नुसरत जहाँ यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ आणि यश दासगुप्त राजस्थान ट्रीपवर एकत्र गेल्याची बातमी आली होती.

त्यामुळे यश दासगुप्ताच्या भाजपा प्रवेशाची जास्त चर्चा होत आहे. यश दासगुप्ताला इंडिया टुडेने बोलते केले. तू भाजपाची निवड का केली ? या प्रश्नावर त्याने सांगितले की, “माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. मोदींचे भारताबद्दलचे जे व्हिजन आहे, त्याने मला राजकारणात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली.”

तुमची मैत्रीण नुसतर जहाँ तृणमुलमध्ये आहेत, आणि तुम्ही भाजपामध्ये या प्रश्नावर यश दासगुप्ता म्हणाला की, “असं का होऊ शकत नाही? घरात कुटुंबामध्ये राजकारण आणि अन्य विषयांवर वेगवेगळी मत असतात, तसचं आहे हे” अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सारखं का ? यावर, “अक्षय आणि ट्विंकलचं लग्न झालय, माझं आणि नुसरतचं लग्न झालेलं नाही” असं त्याने उत्तर दिलं.