करोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. हे वादळ लवकरच अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेत्री ट्विंकल खन्ना मात्र या चक्रिवादळाची वाट पाहातेय.

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर चाहाचा आनंद घेताना दिसत आहे. “पावसात भिजत चहाचा आनंद घेत मी चक्रीवादळाची वाट पाहतेय. ही परिस्थिती फार अनुकूल नाही. त्यामुळे सुरक्षित राहा.” अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओवर केली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ट्विंकलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

समुद्राला उधाण! संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज; ४०,००० नागरिकांना हलवलं

निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररुप धारण केलं असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज झाल्या आहेत.