बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिचा डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ट्वीक इंडिया’वर सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असते. आता ट्विंकलने बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्विंकलने या पोस्टमध्ये राखीची प्रशंसा केली आहे. ही पोस्ट वाचून राखीला प्रचंड आनंद झाला आहे.

ट्विंकलने ‘ट्वीक इंडिया’ हा प्लॅटफॉर्म काही दिवसांपूर्वीच सुरु केला आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे महिलांशी संबंधीत अनेक गोष्टींवर चर्चा सुरु असतात. सेक्स एज्युकेशन, फेमिनिझम या सारख्या मुद्द्यांवर या प्लॅटफॉर्मवर चर्चा केली जाते. आता ट्विंकलने राखीविषयी देखील एक पोस्ट या प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

आणखी वाचा : जन्माष्टमीच्या उर्दूमध्ये शुभेच्छा दिल्याने सचिन पिळगावकरांना नेटकऱ्यांनी दिले मराठीचे धडे

ट्विंकलने ट्वीक इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राखीने फिकट भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच त्यावर साजेशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये राखी अतिशय सुंदर दिसत आहे. राखीच्या या फोटोवर, ‘राखी सावंत एक अशी व्यक्ती आहे जिच्या सारखी मी होऊ शकत नाही आणि म्हणून मला ती खूप आवडते’ या आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tweak India (@tweakindia)

राखीचा हा फोटो शेअर करत छान असे कॅप्शनही देण्यात आले आहे. ‘कित्येक वर्षे राखी सावंतची अनेकांकडून खिल्ली उडवली जात आहे. पण राखीने त्या सर्व गोष्टींचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. मी जर तिच्या जागी असते तर कदाचित हे सर्व सहन करु शकले नसते’ या आशयाचे कॅप्शन ट्विंकलने दिले आहे.

ट्विंकलची ही पोस्ट पाहून राखीने आभार मानले आहेत. तिने या पोस्टचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘तुझ्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून माझ्यासाठी पोस्ट लिहिल्याबद्दल तुझे आभार. आज मी जे काही कमावले आहे त्याचा मला अभिमान आहे. मी माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा सांभाळ करु शकते. लोकांना हसवून, त्यांचे मनोरंजन करुन अनेक अडचणींवर मात केली आहे’ या आशयाचे कॅप्शन राखीने दिले आहे.