जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास ४० हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात सरकारकडून २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वच क्षेत्रांतून मदतीचा ओघ येऊ लागला आहे. अभिनेता अक्षय कुमारने तब्बल २५ कोटी रुपये पीएम केअर फंडमध्ये दान केले आहेत. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिला मात्र देशातील या परिस्थितीबाबत २०१५ मध्येच माहिती मिळाली होती अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे तिची इन्स्टाग्राम पोस्ट.

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर एक स्क्रिप्ट पोस्ट केली आहे. या स्क्रिप्टमध्ये तिने देशातील सध्याच्या परिस्थितीचं वर्णन केलं आहे. मात्र ही स्क्रिप्ट ट्विंकलने २०१५ मध्येच लिहिली होती. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीच ट्विंकलने अचूक भविष्यवाणी केली की काय अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘काही वर्षांपूर्वी मी ही स्क्रिप्ट एडिटर चिकी सरकार आणि जगरनॉट डॉट इन यांना दाखवली होती. मात्र त्यात काही ह्युमर नसल्याचं कारण देत त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे ‘आता कोण हसतंय”, असा उपरोधिक प्रश्न तिने विचारला आहे.

आणखी वाचा : ना अन्न ना औषधी; करोनामुळे गोव्यात अडकलेल्या अभिनेत्रीने सांगितली व्यथा

ट्विंकलची ही पोस्ट पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. ट्विंकल अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती लिखाण करते. वर्तमानपत्रांसाठी स्तंभलेखनसुद्धा करते.