बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी’ ९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसत आहे. पण सध्या सोशल मीडियावर अक्षयच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाला देखील ट्रोल केले जात आहे.

नुकताच ट्विंकलने ट्विटर अकाऊंटवर एक मीम शेअर केले आहे. हे मीम शेअर करत तिने राग व्यक्त केला आहे. ‘मी एक फोटो शोधत असताना मला हा फोटो सापडला. मी तो क्रॉप करुन पुन्हा पोस्ट करत आहे. एका व्यक्तीने मला म्हटले की मी थर्ड क्लास आहे आणि मी त्यांच्या देवावर विनोद केला आहे. यावर मी उत्तर दिलं की, देवाला नक्कीच चांगले विनोद आवडत असतील नाहीतर त्याने तुला निर्माण केलं नसतं’ या आशयाचे ट्विट ट्विंकल खन्नाने केले आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या मीमवर ‘ट्विंकल बॉम्ब’ असे लिहिण्यात आले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून अक्षय कुमारच्या या चित्रपटाच्या नावावरुन वाद सुरु होता. आता या चित्रपटाचं नाव बदलून ‘लक्ष्मी’ इतकंच ठेवण्यात आलं आहे. ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे