अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. चालू घडामोडींवरील तिचे उपरोधिक ट्विट्स नेहमीच अनेकांचं लक्ष वेधतात. किंबहुना उपरोधिक आणि बेधडक ट्विट्साठीच ती ओळखली जाते, असं म्हणायला हरकत नाही. ट्विंकलने नुकताच एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून बालपणींच्या काही गोड आठवणींना तिने उजाळा दिला.

शाळेतील एक जुनं प्रमाणपत्र आणि त्यासोबत गणवेशातील एक फोटो तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये तिची छोटी बहिण रिंकी खन्नासुद्धा पाहायला मिळत आहे. फोटो आणि प्रमाणपत्रासोबतच ‘टीना बुक’ नावाचा एक फ्लॉपी डिस्क असल्याचाही उल्लेख तिने कॅप्शनमध्ये केला. आपण लिखाणाची सुरुवात ९० व्या दशकापासून केला असल्याचंही तिने पुढे म्हटलं.

वाचा : ‘दिल से’मधील मेघनाची भूमिका साकारण्यासाठी ही अभिनेत्री उत्सुक

ब्लॉग असो किंवा वर्तमानपत्रातील सदर, ट्विंकल तिच्या लेखणीमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिची परखड मतं वादाचा विषय ठरतात. अभिनेत्री म्हणून ट्विंकलची कारकीर्द लहान असली तरी लेखिका म्हणून ती यशस्वी ठरली असं म्हटलं जातं. यासंदर्भात तिने स्वत: तिच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. ‘मी वर्गातली सर्वात लठ्ठ मुलगी होते. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार कवितेवरून ‘लाईक अ टी पॉट इन द स्काय’ अशी माझी कुचेष्टा होत असे. त्या न्यूनगंडातून बाहेर पडायला मला पुस्तकांनी मदत केली, आधार दिला,’ असा त्यात उल्लेख आहे.