‘रुस्तम’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने परिधान केलेल्या नौदलाच्या गणवेशाचं तो लिलाव करणार आहे. लिलावातून मिळणारी रक्कम अक्षय एका स्वयंसेवी संस्थेला देणार आहे. मात्र यावरूनच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या लिलावाचं समर्थन करणाऱ्या अक्षयच्या पत्नीवर म्हणजेच ट्विंकल खन्नावर नौदल अधिकाऱ्याने टीका केली. त्यावर आता ट्विंकलनेही धमकी देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटात अक्षयने नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. याच भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. मात्र, या गणवेशाच्या लिलावावरून ट्विंकलला ट्रोल करण्यात आलं. पोशाखाला लिलाव करण्याची कल्पना ट्विंकल्या ब्लॉग, पुस्तकं आणि विनोदांप्रमाणेच विचित्र आहे, असं लेफ्टनंट कर्नल संदीप अहलावत यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याचप्रमाणे चित्रपटात अक्षयने परिधान केलेला पोशाख होता, गणवेश नाही असंही त्यांनी त्यात लिहिलं.

‘भारतीय सेना, नौदल आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या पत्नी त्यांच्या पतीच्या गणवेशाचा लिलाव करत नाहीत. झटपट पैसे कमावण्यासाठी आणि चित्रपटांतील भूमिकांसाठी असलेला गणवेश हा काही फक्त कापडाचा तुकडा नाही. राष्ट्रपतींच्या कार्यालयातून गणवेश वापरण्याची परवानगी मिळते. अतोनात परिश्रमातून हा गणवेश कमावला जातो आणि मृत्यूनंतर जवानांच्या पार्थिवावर तिरंग्यासोबत गणवेशाला ठेवलं जातं,’ अशा शब्दांत त्यांनी ट्विंकलला धारेवर धरलं.

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात असा साजरा होणार ‘महाराष्ट्र दिन’

टीका करत धमकी देणाऱ्या अहलावत यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा ट्विंकलने दिला आहे. ‘सामाजिक कार्यासाठी चित्रपटात वापरल्या गेलेल्या गणवेशाचा लिलाव करण्याविरोधात अशाप्रकारे धमकी देणं शोभनीय आहे का? याचं उत्तर मी धमक्यांच्याच भाषेत न देता योग्य ती कारवाई करून देईन,’ असं ट्विट तिने केलं.