बॉलिवूडप्रमाणेच अमिताभ बच्चन हे ट्विटरचेही ‘शहनशाह’ आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव अग्रस्थानी आहे. मात्र ट्विटरवर नाराजी व्यक्त करत त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या याच ट्विटची दखल घेत चक्क ट्विटरची एक टीम त्यांच्या भेटीला पोहोचली. ट्विटरचे काम कशा पद्धतीने चालते, हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी बिग बींची भेट घेतली.

‘मी ट्विटरच्या दुनियेतून काढता पाय घेत आहे, कारण माझ्या फॉलोअर्सचा आकडा कमी झाल्याचं समजतंय. ट्विटरच्या या समुद्रविश्वात इतरही काही मासे म्हणजेच ट्विटर युजर्स आहेत, जे अनेकांनाच आवडतात,’ असं ट्विट अमिताभ यांनी ३१ जानेवारी रोजी केलं होतं. ट्विटर सोडण्याचा जणू त्यांनी इशाराच दिला होता. त्यांच्या या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आणि ट्विटर कशा पद्धतीने काम करतं, हे समजावून सांगण्यासाठी चक्क ट्विटरची टीम बिंग बींच्या भेटीला पोहोचली. या भेटीदरम्यानचा फोटो शेअर करत बिग बींने टीमचे आभार मानले. ट्विटरचे काम खरंच पारदर्शक आहे, असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं.

वाचा : प्रियाचा चित्रपट पुन्हा अडचणीत; हैदराबाद पोलिसांकडून दिग्दर्शकांना नोटीस

हा फोटो पाहून बिग बींपुढे ट्विटरही नमलं असं म्हणायला हरकत नाही. ट्विटरवर इतरही असे काही सेलिब्रिटी युजर आहेत ज्यांच्या फॉलोअर्सचा आकडा बिग बींच्या फॉलोअर्सच्या आकड्याहूनही जास्त आहे. सर्वाधिक फॉलोअर्सच्या शर्यतीत शाहरुख अमिताभ बच्चन यांना मागे टाकतोय.