X
X

‘सात कोटींसाठी KBC मध्ये विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर सचिन तेंडुलकरलाही ठाऊक नसेल’

READ IN APP

सात कोटींचा प्रश्न हा क्रिकेटसंदर्भातील होता याचेही अनेकांना आश्चर्य वाटले

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे सुत्रसंचालन आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फॉरमॅट यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’ घराघरात पोहचले आहे. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक असणाऱ्या या शोचं सध्या ११ वं पर्व सुरु आहे. या पर्वात पाहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे तो आयएएस परिक्षेची तयारी करणाऱ्या सनोज राज यांनी. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये सनोज यांनी एक कोटी रुपये जिंकले. एकूण १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत ते करोडपती झाले. मात्र ७ कोटींसाठी विचारण्यात आलेल्या १६ व्या प्रश्नाचे उत्तर त्यांना येत नव्हते त्यामुळेच त्यांनी एक कोटी रुपये स्वीकारत खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी ७ कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न खूपच अवघड होता असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

अमिताभ यांनी सनोज यांना सात कोटींसाठी विचारलेला प्रश्न क्रिकेटसंदर्भात होता. ‘ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शंभरावे शतक साजरे करताना शंभरावी धाव कोणत्या भारतीय गोलंदाजाविरुद्ध काढली होती?,’ हा प्रश्न सात कोटींसाठी सनोज यांना विचारण्यात आला होता. मात्र एक कोटी रुपये जिंकलेल्या सनोज यांना या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नव्हते. त्यातच त्यांनी एक कोटी जिंकल्याने त्यांना अंदाज व्यक्त करुन कमावलेले एक कोटी रुपये गमावायचे नव्हते. याच कारणामुळे सनोज यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

खेळ सोडल्यानंतर सनोज यांना दिलेल्या पर्यायांपैकी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता असे विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी कमंदरु रंगचारी हा पर्याय निवडला. मात्र हे उत्तर चुकीचे होते. ‘ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शंभरावे शतक साजरे करताना शंभरावी धाव गोलूमल किशनचंद यांच्या गोलंदाजीवर काढली होती,’ असं अमिताभ यांनी सांगितले.

सनोज यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेत आनंदाने एक कोटी रुपये स्वीकारले. ‘मला विश्वास होत नाहीय मी एक कोटी जिंकलो आहे,’ अशी पहिली प्रतिक्रिया सनोज यांनी व्यक्त केली.

एकीकडे सनोज यांनी आनंद व्यक्त केला असला तरी या प्रश्नावरुन नेटकरी चांगलेच खवळलेले दिसले. अनेकांनी तर क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसेल असे मत ट्विटवर व्यक्त केले.सात कोटींचा प्रश्न क्रिकेटबद्दल?तर एकाने थेट समालोचक हर्षा भोगले यांनाच टॅग करुन हा सवाल विचारला.

दरम्यान या पर्वामधील सनोज हा पहिलाच करोडपती ठरला आहे. या हंगामामध्ये कोणी सात कोटींपर्यंत मजल मारु शकते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

21
X