काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धूंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवला आहे. राजीनाम्याच्या या वृत्ताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नेटकऱ्यांनी तर सिद्धूंना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतण्याचा सल्लाच दिला आहे. इतकंच नव्हे तर काहींनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पुन्हा एकदा स्वागत असंच म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूंनी पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी टीकेचा भडीमार करत कपिल शर्मा शोमधून सिद्धूंना हाकला अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना शोमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांच्या जागी सध्या अर्चना पुरण सिंग शोमध्ये आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने सिद्धूंनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. पंजाबमध्ये सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्याचं खापर सिद्धूंवर फोडून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर ६ जून रोजी झालेल्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांनी सिद्धूसहीत अनेक मंत्र्यांचे खातेही बदलले होते.