अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यापासून अक्षयच्या नागरिकत्वावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अक्षय आणि त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा वाद काही केल्या शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी अक्षयने ‘मी गेल्या ७ वर्षात कॅनडाला फिरकलो नाही’ असं वक्तव्य केलं होतं. मात्र अक्षयचा हा दावा खोटा असल्याचं एका ट्विटर युजरने म्हटलं आहे. त्यासोबतच त्याने दोन स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

“माझ्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे ही गोष्ट मी कधीही कोणापासून लपविली नाही. शिवाय , गेल्या सात वर्षांमध्ये मी एकदाही कॅनडाला गेलेलो नाही”, असं ट्विट अक्षयने काही दिवासांपूर्वी केलं होतं. मात्र अक्षयचं हे वक्तव्य खोटं असल्याचा दावा एका नेटकऱ्याने केला आहे. या युजरने अक्षयचा दावा खोटा असल्याचे काही पुरावेही दिले आहेत.

या युजरने काही ट्विटचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. या ट्विटपैकी एक ट्विट गायक मिका सिंग याचं असून त्याने ९ मार्च २०१४ रोजी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये ‘गुड मॉर्निंग, अक्षय कुमार, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, राहुल खन्ना. तुमच्यासोबत पार्टीत धम्माल आली’ असं म्हटलं होतं. तर दुसऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये अक्षय टीना वीरमानी हिच्या संगीत सोहळ्यामध्ये दिसत असून हा सोहळा टोरंटोमधील एका हॉटेलमध्ये होता. त्यामुळे अक्षयने केलेला दावा खोटा असल्याचं या युजरने म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील ७, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी अक्षय कुमारने मोदी यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून अक्षयला ट्रोल करण्यात येत आहे. देशभक्तीवर कायम बोलणाऱ्या अक्षयने लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मतदान का केलं नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारला होता. त्यानंतर अक्षयने या मागचं कारणदेखील सांगितलं होतं. विशेष म्हणजे यावेळी त्याने कॅनडाला न गेल्याचा खुलासाही दिला मात्र, आता त्याचा हा दावा खोटा असल्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.