अभिनेत्रा स्वरा भास्कर आणि महिला कुस्तीपटू बबिता फोगट यांच्यात सध्या ट्विटर वॉर सुरु झाले आहे. बबिताने करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तबलिगी जमातीवर थेट निशाणा साधला होता. या आरोपांवर स्वराने एका ट्विटच्या माध्यमातून बबिताला उत्तर दिले होते. या उत्तरावर आता पुन्हा एकदा बबिताने प्रतिक्रिया दिली आहे. करोनाचा प्रसार करण्यात ही मागास जमातच पुढे का आहे? हा प्रश्न तिने स्वराला विचारला.

नेमकं काय म्हणाली बबिता?

“१३५ कोटी लोकांच्या देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दिल्लीमधून लाखो कर्मचारी बिहार आणि उत्तर प्रदेशात गेले. मात्र करोनाचं संक्रमण करण्यात ही मागास जमातच पुढे का आहे?” अशा आशयाचे ट्विट बबिताने केले आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वरा आणि बबितामधील हे ट्विटर वॉर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आहेत.

यापूर्वी काय म्हणाली होती स्वरा भास्कर?

“बबिता जी, ही आकडेवारीदेखील पहा! या लाखो जणांच्या करोना चाचणी झाल्या असतील? कृपया यावर तुमचं मत काय आहे ते सांगा आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी कशी दिली हा प्रश्नदेखील नक्कीच उपस्थित करा. बाकी मी तर तुमची चाहती आहेच”, असं ट्विट स्वराने केलं होतं.

कोणत्या ट्विटवरुन वाद सुरु आहे

काही दिवसांपूर्वी बबिता फोगटने एक ट्विट करत तबलिगी जमातवर निशाणा साधला होता. यात तिने म्हटलं होतं की, करोना व्हायरस भारतातील दुसऱ्या क्रमांकाची समस्या आहे. तिच्या या ट्विटवर मोठा वाद झाला आहे. कारण तिने पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. यानंतर तिला ट्रोल केलं जात असून ट्विटरला #SuspendBabitaPhogat, #बबीता_फोगाट हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.