चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार समजला जाणाऱ्या ‘फिल्मफेअर’ने नामांकनांची यादी नुकतीच जाहीर केली. फिल्मफेअर पुरस्कारासाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना दोन नामांकनं मिळाली. मात्र त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप असतानाही हे नामांकन मिळाल्याने नेटकरी चिडले. दिग्दर्शकावर #MeToo मोहिमेअंतर्गत आरोप असतानाही त्यांना नामांकित का केले असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

आरोपांना दुर्लक्ष करत हिरानी यांना नामांकन दिल्याने काही युजर्सनी फिल्मफेअरलाही लक्ष्य केले. फिल्मफेअरचे नाव मोठे पण लक्षण खोटे अशी टीका एका युजरने केली.

पीके, संजू, थ्री इडियट्स यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर त्यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने आरोप केले होते. मार्च ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत हिरानी यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केली असा आरोप त्या महिलेने केला होता. हिरानी यांनी आपल्यावर अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी माझे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. आपण या शोषणाला विरोध केल्यानंतर आपल्याकडून चित्रपट काढून घेतला जाईल अशी धमकीही त्यांनी दिल्याचे संबंधित महिलेने म्हटले होते. हिरानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार पुढे येत हिरानी यांची बाजू घेतली होती.