‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रिया वारियरचे बॉलिवूड पदार्पण वादात अडकले आहे. आगामी ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. एकीकडे निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांनी चित्रपटाच्या टीझरवर आक्षेप घेत दिग्दर्शकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही टीझरवर संताप व्यक्त केला आहे.

प्रशांत मंबुली दिग्दर्शित ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला. यामध्ये प्रिया श्रीदेवी नामक एका अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. टीझर पाहून हा चित्रपट दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एका अभिनेत्रीचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला असून टीझरच्या शेवटी त्या अभिनेत्रीचा बाथटबमध्ये मृत्यू होतो. बोनी कपूर यांच्या पत्नी आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचाही दुबईत बाथटबमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. नेटकऱ्यांनीही या टीझरवर टीका केली आहे.

‘श्रीदेवी बंगलो’चे दिग्दर्शक प्रशांत यांनी हा चित्रपट श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे बोनी कपूर यांच्या नोटीशीला उत्तर देऊ असंही ते म्हणाले आहेत. टीझरमध्ये ज्याप्रकारे अभिनेत्रीचा मृत्यू दाखवला आहे, त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. श्रीदेवींसारख्या अभिनेत्रीच्या मृत्यूचे अशा प्रकारे चित्रीकरण दाखवणं अजिबात रुचले नाही, अशी कमेंट काही युजर्सनी केली आहे.