लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली अटक झालेला गायक मिका सिंगची भारतीय दुतावासाच्या हस्तक्षेपानंतर सुटका झाली आहे. मिका सिंगची तुरुंगातून सुटका झाली असून त्याला आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती संयुक्त अरब अमिरातीमधील भारताचे उच्चायुक्त नवदीपसिंग सुरी यांनी दिली.

ब्राझीलच्या १७ वर्षांच्या मॉडेलने मिका सिंगवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मॉडेलने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मिका सिंगला ताब्यात घेतले होते. मिकाने मला मोबाईल अश्लील छायाचित्र पाठवल्याचा आरोप तिने केला होता.

दुबईमधील मुराक्कबात पोलीस ठाण्यामध्ये मिकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला बुधवारी मध्यरात्री ३ वाजता बड दुबई येथून ताब्यात घेण्यात आले. बॉलिवूडच्या ‘मसाला अॅवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्ससाठी मिका दुबईला गेला होता. मिका सिंगला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मिकाने भारतीय दुतावासाकडे मदत मागितली होती. शेवटी भारतीय दुतावासाने या प्रकरणात हस्तक्षेप केला.

यूएईतील भारतीय दुतावासातील उच्चायुक्त  नवदीपसिंग सुरी यांनी सांगितले की, मिका सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, भारतीय दुतावासाच्या हस्तक्षेपानंतर मिका सिंगला सोडण्यात आले. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.