19 January 2019

News Flash

…जेव्हा बॉलिवूडचा खिलाडी साताऱ्याच्या उदयनराजे भोसलेंना भेटतो

उदयनराजे सेटवर आल्याचे कळताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. प्रत्येकाला आता उदयनराजेंसोबत सेल्फी घ्यायची घाई होती

उदयनराजे भोसले आणि अक्षय कुमार

सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा केसरीच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाचे अधिकतर चित्रीकरण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात होत आहे. अक्षयला पाहण्यासाठी सातारकर सिनेमाच्या सेटवर गर्दी करत होते. यादरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पिंपोडे येथे जाऊन केसरी स्टार अक्षय कुमारची भेट घेतली. एक सिनेमांचा राजा तर दुसरा सातारकरांचा आवडता नेता. या दोघांना एकत्र पाहून सातारकरांना सुखद धक्का बसला.

उदयनराजे भोसले यांनी पिंपोडे परिसरात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांना केसरी सिनेमाचे चित्रीकरणही याच परिसरात सुरू असल्याचे कळले. त्यामुळे अक्षयला भेटण्यासाठी ते केसरी सिनेमाच्या सेटवर गेले. उदयनराजे सेटवर आल्याचे कळताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. प्रत्येकाला आता उदयनराजेंसोबत सेल्फी घ्यायची घाई होती. दरम्यान, एका कर्मचार्‍याने उदयनराजे आल्याची माहिती अभिनेता अक्षय कुमारला दिली.

अक्षयही उदयनराजेंना भेटायला गेला आणि दोघांनी काही वेळ गप्पाही मारल्या. यावेळी अक्षय म्हणाला की, सातारा जिल्हा हा माझा पहिल्यापासूनच आवडीचा राहिला आहे. आता तर केसरीचे चित्रीकरण इथे सुरू आहे. पण याआधी माझ्या खट्टा- मिठा सिनेमाचे चित्रीकरणही फलटणमध्ये केले होते. उदयनराजेंनेही यावेळी अक्षय कुमारच्या सामाजिक कामाचे भरभरून कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील भूमीपुत्रांना या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दिलेल्या रोजगाराबद्दलही त्याचे आभार मानायला ते विसरले नाहीत.

First Published on April 13, 2018 5:22 pm

Web Title: udayanraje bhosale meet kesari actor akshay kumar in satara