अनुराग कश्यपचा संतप्त सवाल : ही लोकशाही की उत्तर कोरियातली हुकूमशाही?

चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचा कारभार कसा सुधारावा, यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या समितीने केलेल्या अनेक शिफारशी म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणीच ठरल्या असून अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या शीर्षकातील पंजाबच वगळा, या सूचनेपासून मंडळाने चित्रपटात तब्बल ८९ कट्स सुचविले आहेत. यामुळे ही उत्तर कोरियातली हुकूमशाही आहे काय, असा संतप्त सवाल निर्माता अनुराग कश्यपने केला आहे.

गेल्या आठवडय़ातच ‘उडता पंजाब’ चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडल्याची चर्चा होती. त्या वेळी चित्रपटाची सेन्सॉर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अनुरागने दिल्यामुळे ही चर्चा थांबली होती. मात्र पुन्हा एकदा चित्रपटातून ‘पंजाब’ वगळा या मागणीसह ८९ कट्स सुचवत सेन्सॉर बोर्डाची ‘निहलानी’ कात्री चित्रपटावर चालवण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष निहलानी यांनी वैयक्तिकरीत्या आपली असहमती सांगितली आहे, असा दावा करत जोपर्यंत बोर्डाकडून अधिकृत पत्र येत नाही तोपर्यंत पुढचे पाऊल उचलले जाणार नाही, असे चित्रपटाचा निर्माता अनुराग कश्यपने स्पष्ट के ले. ‘उडता पंजाब’विषयी प्राथमिक परीक्षणातच परीनिरीक्षण मंडळातील सदस्यांमध्ये मतभेद झाल्याने चित्रपट फेरपरीक्षणासाठी पाठवण्यात आला होता. फेरपरीक्षणानंतर मंडळाने ८९ ठिकाणी कात्री चालविल्याने अनुरागचा संयम सुटला. ‘उडता पंजाब’सारखा प्रामाणिक चित्रपट नाही आणि जो पक्ष या चित्रपटाचा विरोध करेल त्याला प्रत्यक्षात अंमली पदार्थाच्या प्रसिद्धीबद्दल अपराधी ठरवले पाहिजे, अशा कडक शब्दांत अनुरागने ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला. आता मला उत्तर कोरियाला विमान पकडून जायची गरज नाही. तिथली हुकूमशाही इथेच अनुभवता येत आहे, असा टोलाही अनुरागने हाणला आहे. आपली लढाई बोर्डावर बसलेल्या हुकूमशहाशी आहे, या शब्दांत त्याने नाव न घेता अध्यक्ष पहलाज निहलानींवर टीकाही केली. मात्र मंडळाने याविषयी अधिकृत पत्र दिले पाहिजे, तरच आपल्याला ‘फिल्म सर्टिफि केशन अ‍ॅपिलेट ट्रिब्युनल’कडे दाद मागता येईल, असे त्याने स्पष्ट केले आहे.  अनुरागच्या ट्विटनंतर करण जोहर, महेश भट्ट, रामगोपाल वर्मा, हंसल मेहतांसारख्या मातबरांनी मंडळाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे.

बेनेगल यांच्यासाठी खास शो

चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या कारभारातील बदलांसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्यासाठी या चित्रपटाचा खास शो होणार आहे. मुंबईत बुधवारी त्यांना हा चित्रपट दाखविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.