02 March 2021

News Flash

‘उलट सुलट’ हृदय पिळवटणारी वेदना

हे शेतकरीपुराण इथं लावायचं कारण नुकतंच पाहिलेलं एक उत्कट नाटक..

दोन वर्षांमागे तूरडाळ टंचाईने लोक संत्रस्त झाल्यामुळे मोदी सरकारने शेतकऱ्यांना तुरीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घ्यायला सांगितलं आणि तुरीला चांगला हमीभाव देण्याचं आश्वासनही दिलं. त्यानुसार शेतकऱ्यांनी तूरडाळीचं पीक घेतलं. पण सरकार दिल्या शब्दाला जागलं नाही. आधीच आयात तूरडाळीमुळे बाजारात तुरीचे भाव घसरले होते. तशात सरकारने हमीभाव आणि शेतकऱ्यांकडून सर्व तूरडाळ विकत घेण्याचं आश्वासनही पाळलं नाही. भरीस भर व्यापाऱ्यांनीच सरकारला तूरडाळ विकली. त्यामुळे शेतकऱ्यांची जास्तीची तूरडाळ विकत घ्यायला सरकारने नकार दिला. सरकारच्या आश्वासनावर मरमर मरून घेतलेलं पीक मातीमोल झालं. त्यात आणखीन नोटाबंदीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. अशाने त्यांना आत्मघातावाचून दुसरा मार्ग काय उरणार? कर्ज-परतफेडीची टांगती तलवार आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं दुसरं करावं तरी काय?

गेली कित्येक वर्षे शेतकरी अशाच प्रकारे अस्मानी सुलतानी, कर्जाचा वाढता डोंगर, बाजारपेठेची नागवणूक आणि त्याचा गळा घोटणारी सरकारी धोरणे यांना तोंड देता देता मेटाकुटीला आलेला आहे. शहरी ग्राहकांना मात्र शेतकऱ्याचा मुखवटा धारण केलेले धनदांडगे राजकारणी तेवढे दिसतात. त्यांच्यातच ते गरीब शेतकऱ्यालाही मोजतात आणि त्याच्या नावानं बोटं मोडतात. अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन मजूर हे मात्र त्यांच्या खिजगणतीत नसतात. सरकारलाही आपल्या तुंबडय़ा भरणारा शहरी विकासच दिसतो. आजही देशात ६० टक्क्यांहून अधिक लोक शेतीवर अवलंबून असताना त्यांना वाऱ्यावर सोडून विकासाच्या शहरी प्रारूपाचं डिंडिम बडवणाऱ्या आणि त्यातच मश्गुल असलेल्या ढोंगी नेत्यांची ही चाल आता शेतकऱ्यांना कळली आहे. पण गेंडय़ाच्या कातडीच्या व्यवस्थेशी टक्कर देण्याचं बळ त्याच्यात आता उरलेलं नाही. संपावरील शेतकऱ्यांना चर्चेच्या घोळात अडकवून कात्रजचा घाट दाखवणाऱ्या बनेल नेत्यांची सोंगं सरळमार्गी शेतकऱ्यांच्या ध्यानात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार मागील पानावरून पुढे सुरूच राहतात.

हे शेतकरीपुराण इथं लावायचं कारण नुकतंच पाहिलेलं एक उत्कट नाटक.. बळीराजाच्या पिळवणुकीला वाचा फोडणारं! किरण मानेलिखित, कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘उलट सुलट’ हे ते नाटक! नाटकाचा विषय थोडासा बेतलेला असला तरी काळजाला भिडणारा आहे. मेलोड्रामाही कधी कधी अंगभूत मर्यादा ओलांडून एका वेगळ्याच उंचीवर जातो, त्यातलं हे एक नाटक. नाटकातील कथावस्तू योगायोग आणि बेतलेपणाची जाणीव करून देणारी असली तरीही हे सारं विसरायला लावण्याचं सामर्थ्य या नाटकात निश्चितच आहे.

अभय देशमुख हा शहरातील एक नामांकित वकील. मित्र विश्वजीतबरोबर त्याचा परदेशातून फळे, भाजीपाला, धान्यधुन्य आयात करण्याचा धंदा आहे. पत्नी श्वेता आणि दोन गोड मुलांसह त्याचा सुखी-समाधानी संसार आहे. आणि अशात एके दिवशी मुलांसह पुण्याला जात असताना श्वेताच्या गाडीस अपघात होतो आणि सगळं होत्याचं नव्हतं होतं. श्वेता आणि मुलांच्या अकल्पित मृत्यूनं अभय सर्वस्वानं उन्मळून पडतो. विश्वजीत आणि त्याची मैत्रीण ईषिता त्याला या दु:खातून सावरायचा प्रयत्न करतात खरे; परंतु त्यांच्या फुंकरीनंही अभयचं दु:ख हलकं होत नाही. अशात ज्या टेम्पोची श्वेताच्या गाडीला धडक बसली होती त्या टेम्पोचा ड्रायव्हर सदानंद मानुरकर अभयच्या घरी येतो आणि आपल्या हातून घडलेल्या भीषण गुन्ह्य़ाची कबुली देत अभयला या दु:खातून बाहेर काढेपर्यंत त्याची सेवा करण्याची अनुमती मागतो. आपलं सर्वस्व असलेल्या कुटुंबीयांच्या मृत्यूला कारणीभूत सदाला डोळ्यासमोरही धरणं अभय शक्य नसतं. परंतु त्याच्या अगतिक विनवण्यांनी कशी कुणास ठाऊक, अभयला उपरती होते आणि तो त्याला आपल्या घरी ठेवून घ्यायला राजी होतो.

नम्र सेवाभाव आणि पाककलेतील आपल्या नैपुण्याने हळूहळू सदा अभयच्या अंतरंगात शिरतो. खरं तर त्या दुर्दैवी अपघातात सदाची चूक नसतेच. श्वेतानंच चुकीच्या लेनमध्ये गाडी घातल्यानं तो झालेला असतो. परंतु एका भल्या गृहस्थाचं कुटुंब आपल्यामुळे ध्वस्त झाल्याची जीवघेणी वेदना सदाला बेचैन करत राहिल्याने त्या अपराधभावातून बाहेर येण्यासाठी तो अभयच्या घरी आलेला असतो. त्याची सेवा करत असतो.

मूळचा शेतकरी असलेल्या सदाचं कुटुंब असंच त्यांची काही चूक नसताना उद्ध्वस्त झालेलं असतं. ते दु:ख त्याचं काळीज पिळवटत असतं. पण मनाच्या खोल कप्प्यात त्यानं ते गाडून टाकलेलं असतं. अभयचं दु:ख म्हणूनच तो समजू शकतो. आणि त्यास आपण कारण ठरलो, हा सल त्याला छळत असतो.

पुढे नाटक नाटय़पूर्ण कलाटणी घेतं. सदाला उद्ध्वस्त करण्यात अभयचाच हात असतो, हे सत्य पुढे येतं. कसं? ते प्रत्यक्ष नाटकात पाहणंच उचित. अर्थात इतकीच ती कलाटणी नाहीए.

लेखक (व अभिनेते) किरण माने हे स्वत: शेतकरी कुटुंबातले असल्यानं त्यांच्या व्यथा-वेदना, दु:ख, हतबलता त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. म्हणूनच शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना त्यांची पोटतिडिक नाटकात सशक्तपणे उतरली आहे. केवळ शेतकऱ्यांचं दु:ख व वेदना मांडणारं हे नाटक रडगाणं ठरू शकलं असतं. परंतु त्याची सांगड व्यक्तिगत आयुष्याशी घालण्याची लेखकानं योजलेली युगत इथं यशस्वी ठरली आहे. किंबहुना, या दु:खाचं समांतरपण नाटकाला एक आगळं परिमाण देऊन जातं. शहरी माणसाचा शेती आणि शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याचं प्रत्यक्षातलं जगणं याबद्दलची सदा आणि अभयमधील कडाक्याची चर्चा हा या नाटकाचा ‘यूएसपी’ आहे. शहरी माणसांचे शेतकऱ्याबद्दलचे अनेक समज-गैरसमज त्यातून दूर होऊ शकतील. जागतिकीकरण आणि खासगीकरणाचे व्यापक संदर्भ या समस्येला आहेत. अतुल पेठेंचं ‘चौक’ हे नाटक याबद्दल थेटपणे व्यक्त झालेलं होतं. मात्र, ‘उलट सुलट’मध्ये व्यक्तीजीवनाला लगडून हे संदर्भ येत असल्याने त्याची परिणामकारकता अधिक टोकदार बनली आहे. पूर्वी आपला शत्रू नेमका कोण, हे शेतकऱ्याला समजत असे. पण आता अनेक अदृश्य शत्रूंनी त्याला घेरलं आहे. जे समोर येत नाहीत अशांशी त्याला लढायचं आहे. तेही अपुऱ्या साधनसामग्रीनिशी. कसं शक्य आहे हे? पण लक्षात कोण घेतो? सरकार आणि शहरीजन जागतिकीकरणाच्या भूलभुलय्यात रममाण आहेत. त्याच्या लाभांनी त्यांचे डोळे दिपले आहेत. त्यात गरीब, पददलित मात्र हकनाक भरडून निघतो आहे. या अर्थानं हे नाटक व्यक्तीकडून समष्टीकडे जातं.

दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी हे द्वंद्व ताकदीनं सादरीकरणातून व्यक्त होईल याची खबरदारी घेतली आहे. नाटय़विषयाचं बेतलेपण विसरायला लावून त्यातला कळीचा मुद्दा त्यांनी नेमकेपणानं अधोरेखित केलेला आहे. मात्र त्यांनी फक्त मुख्य पात्रांवरच लक्ष केंद्रित केल्याने ईषितासारखं पात्र काहीसं दुर्लक्षिलं गेलं आहे. खंर तर या पात्राला नाटय़गत एक ‘भूमिका’ आहे; जी नीटपणे वापरली गेलेली नाही. अर्थात विषयाच्या सखोलतेमुळे ती दृष्टीआड करता येते. आणखी एक बाब : सदाच्या येण्यानं अभयचं दु:खातून बाहेर येणं खूप त्वरेनं होतं. ही गोष्ट खटकते. ज्यानं आपलं अख्खं कुटुंब गमावलंय अशी व्यक्ती त्या धक्क्य़ातून सहजी बाहेर येऊ शकत नाही. अगदी ती कितीही बुद्धिवादी असली, तरीही. हा जीवघेणा घाव संथगतीनंच भरून निघतो. असो. यालाच अनुषंगून माणसाचं निसर्गापासून दुरावणंही नाटकात ऐरणीवर येतं. माणसाची संवेदनशीलता हरवण्याचं तेही एक कारण आहे. अशा अनेकानेक मुद्दय़ांना हे नाटक हात घालतं.

प्रदीप मुळ्ये यांनी अभयचं सुखी कौटुंबिक घर नेपथ्यातील तपशिलांतून साकारलं आहे. राहुल रानडे यांचं संगीत नाटय़ांतर्गत ताण गडद करतं. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेनं त्यास खोली प्राप्त करून दिली आहे. महेश शेरला (वेशभूषा) आणि कुंदन दिवेकर (रंगभूषा) यांनी पात्रांना ठाशीव व्यक्तित्व दिलं आहे.

या नाटकात दोनच पात्रं केन्द्रस्थानी आहेत. अभय आणि सदा. त्यापैकी सदाच्या भूमिकेचं आव्हान मकरंद अनासपुरे यांनी मोठय़ा सामर्थ्यांनं पेललं आहे. त्यांची प्रत्यक्ष जीवनातील शेतकऱ्यांप्रतीची बांधिलकी आणि त्यातून त्यांच्याशी जुळलेलं त्यांचं आतडय़ाचं नातं सदाची भूमिका जिवंत करताना त्यांना साहाय्यकारी ठरलं आहे. सदाला त्यांनी शरीर व आत्माही दिला आहे. सदाची तडफड, तगमग, दु:ख आणि आंतरिक वेदना सर्वार्थानं पोहोचविण्यात म्हणूनच ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या अत्युत्तम भूमिकांमध्ये या भूमिकेमुळे आणखी एकानं भर पडली आहे. किरण माने यांनीही अभय देशमुखचं बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व आणि त्याचं तरल, उत्कट माणूसपण प्रत्ययकारी केलं आहे. सदाला डिवचत, त्याच्याशी कडाक्याने वाद घालत शेतकरी प्रश्नांवरची चर्चा आणि वितंडवाद त्यांनी रोखठोक युक्तिवादानिशी रंगवला आहे. विश्वजीतची आपमतलबी वृत्ती समीर देशपांडे यांनी देहबोली व संवादफेकीतून पुरेपूर व्यक्त केली आहे. ईषिताचं छछोरपण कृतिका तुळसकरने योग्य पद्धतीनं दर्शवलं आहे. श्वेताचं मातीत पाय रोवून असणं तन्वी पंडित यांनी हळुवार संवेदनशीलतेतून व्यक्त केलं आहे. भूषण गमरे आणि समीर सोनावणे यांनीही आपली कामं चोख केली आहेत. शेतकरी प्रश्नावर ठोसपणे व्यक्त होणारं आणि तरीही  नाटय़पूर्णतेनं खिळवून ठेवणारं ‘उलट सुलट’ चुकवू नये असंच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:56 am

Web Title: ulat sulat marathi natak
Next Stories
1 स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘शतदा प्रेम करावे’
2 नार्कोजचे गँगवॉर
3 नंदनवनातील मुर्दाड जग..
Just Now!
X