आजवर बॉलिवूडमध्ये अनेक आशयघन आणि वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती झाली. यामध्ये काही चरित्रपट आहेत तर काही चित्रपटांची निर्मिती हॉलिवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटांच्या कथानकावर आधारित. सध्या बॉलिवूडमध्ये असाच एक नवा चित्रपट येणार असून हा चित्रपट एका हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, हॉलिवूड अभिनेत्री उमा थुर्मन हिची प्रमुख भूमिका असलेला हॉलिवूडपट ‘किल बिल’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने केवळ हॉलिवूड नाही तर संपूर्ण जगभराला वेड लावलं होतं. दोन भागांमध्ये विभागल्या गेलेल्या ‘किल बिल’ या चित्रपटाच्या सीरिजचा लवकरच हिंदी रिमेक येणार असून या चित्रपटाचे अधिकार निखिल द्विवेदी यांच्या प्रोडक्शन हाऊसला मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

निखिल द्विवेदी यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गंत ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचीही निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता लवकरच ‘किल बिल’चा रिमेकही तयार होणार आहे.

दरम्यान, ‘किल बिल’ हा चित्रपट दोन पार्टमध्ये असून या चित्रपटाच्या पहिला पार्ट २००३ मध्ये आला होता. तर दुसरा पार्ट २००४ मध्ये. विशेष प्रसिद्धी मिळविलेल्या ‘किल बिल’च्या पहिल्या पार्टने ४ अब्ज ८३ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या पार्टनेही तुफान कमाई केली होती.

‘किल बिल’ हा चित्रपट एका लढवैय्या महिलेवर आधारित असून या महिलेची भूमिका उमा थुर्मनने वठविली आहे. आपल्या अधिकारासाठी लढणारी महिला थेट जपानमध्ये जाऊन पोहोचते आणि अधिकारांची लढाई जिंकते असं या चित्रपटाचं कथानक आहे. त्यामुळे हॉलिवूडचा हा चित्रपट लवकरच बॉलिवूड प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे.