बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक बनवणे हे तितकंस नाविण्याचं राहिलं नाही. सध्या जर बॉलिवूडमध्ये हिरो बनायचे असेल तर सिक्स पॅक हे हवेच असा काहिसा अलिखित नियमच झाला आहे. त्यामुळेच बॉलिवूडचे कलाकार नेहमी ‘फिट अॅण्ड फाइन’ दिसतात. मराठी कलाकारांमध्ये मात्र हे सिक्स पॅक बनवण्याचे प्रमाण कमी दिसते.
पण आता यामध्ये मराठी कलाकारही कुठे मागे राहत नाहीत हेच दिसत आहे. याचं उत्तम आणि ताजं उदाहरण म्हणजे उमेश कामत. उमेश नेहमीच सायकलिंग करतो. जीममध्येही नित्यनियमाने जात असतोच. फिटनेसविषयी तो फार जागृत आहे. त्याच्या या मेहनतीचे फलीत म्हणजे  त्याने नुकतेच सोशल मीडियावर मेहनतीने कमावलेल्या सिक्स पॅक अॅब्सचा फोटो अपलोड केला आहे. आता जीममध्ये घाम गाळायचा म्हणजे मेहनत आलीच.
त्याच्या या फोटोला मेसेजही प्रोत्साहीत करणारा असाच दिला आहे. कोणतेही काम करताना त्यात समस्या येतील, तुमच्या त्या कामाबद्दल अनेक लोक साशंकही असतील, पण सततच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करु शकता, अशा आशयाचा मेसेज त्याने इन्स्ट्राग्रामवर लिहीला आहे. त्याने हा फोटो आजच इन्स्ट्राग्रामवर अपलोड केला आहे. आज प्रिया बापटचाही वाढदिवस आहे. त्यामुळे बायकोला ही वाढदिवसाची अनोखी भेटच त्याच्याकडून मिळाली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
सध्या त्याच्या या सिक्स पॅक अॅब्सचे सोशल मीडियावर फार कौतुक होत आहे. त्याचे कौतुक करण्यामध्ये अनेक कलाकारांचाही सहभाग आहे. पण त्यांनी उमेशचे फक्त कौतुक करण्यापेक्षा त्याच्यासारखे फिट राहिले तर मराठी सिनेसृष्टीला असे अनेक फिट अॅण्ड फाइन कलाकार पाहायला मिळतील नाही का?