बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. पाकिस्तानी मंत्र्याने प्रियांकाला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, जावेद अख्तर आणि आयुषमान खुरानाने प्रियांकाला पाठिंबा दिला होता. आता UNICEF च्या प्रवक्त्यांनी या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे.

संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल स्टेफन डुजारिक यांना प्रियांका चोप्रा संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी ‘जेव्हा UNICEF चे सदिच्छा दूत असलेली व्यक्ती एखाद्या मुद्यावर वैयक्तीक पातळीवर मत मांडते तेव्हा त्यांना आपल्या खासगी आयुष्यावर बोलण्याचा आधिकार असतो’ असे स्टेफन डुजारिक यांनी म्हटले आहे.

‘पण जेव्हा संयुक्त राष्ट्राचे सदिच्छा दूत म्हणून एखादी व्यक्ती बोलते तेव्हा संयुक्त राष्ट्राच्या विचारसरणीला धरून निपक्षपणे मत मांडणे अपेक्षित असते’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

या प्रकरणाची सुरुवात प्रियांकाने बालाकोट एअर स्ट्राइकनंतर केलेल्या ट्विटपासून झाली. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर प्रियांक चोप्राने टि्वट करुन “जय हिंद” म्हटले होते. आयशा मलिकने त्या टि्वट संदर्भात प्रियांकाला ढोंगी म्हटले होते. त्यावर प्रियांकाने “मी भारतीय असून माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत. मला स्वतःला युद्ध व्हावं असं वाटत नाही. पण मी देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याची माफी मागते” असे उत्तर दिले होते.

“माझ्या मते सर्वांसाठी एक माध्यम मार्ग असतो. तुझ्यासाठीही असेल. पण ज्या पद्धतीने तू माझ्यावर ओरडून बोलत आहेस हे योग्य नाही. आपण इथं प्रेमाच्या भावनेनं एकत्र आलो आहोत” असे प्रियांका तिला म्हणाली होती. २६ फेब्रुवारीच्या प्रियांका चोप्राच्या टि्वटवरुन संयुक्त राष्ट्राची सदिच्छा दूत म्हणून तिच्या भूमिकेवर आयशाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.