|| सुहास जोशी

गुन्हेशोधकथा पडद्यावर मांडायची पठडी अनेकवेळा ठरलेली असते. काही हमखास हिट होतील अशा करामती, थोडे नाटय़, थोडं रहस्य आणि अखेरीस गुन्हेगार ताब्यात. पण एखाद्या सत्यकथेवर बेतलेली सीरिज असेल तर मात्र त्यात सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखालीदेखील फार काही करायची सोय नसते. त्यातही कथानकाचा बाज हा टिपिकल रहस्यमय शोधकथेच्या पलिकडे जाणारा असेल तर मग सीरिजकर्त्यांना स्वतंत्र मेहनत घ्यावी लागते. तशीच मेहनत ‘अनबिलिव्हेबल’ या वेबसीरिजमध्ये दिसून येते. दोन वर्षांच्या काळात झालेल्या चार बलात्कारांचा तपास करतानाची गुंतागुंत यात अतिशय संयत आणि प्रभावीपणे मांडली आहे.

अमेरिकेत घडलेली ही सत्यकथा आहे. वसतिगृहात राहणारी मारी या महाविद्यालयीन तरुणीवर मध्यरात्री बलात्कार होतो. त्या प्रसंगानंतर ती सुन्न होते. पोलीस, विशेष पोलीस, समुपदेशक अशा सर्वासमोर प्रसंगाची माहिती देताना अखेरीस आपल्यावर नक्की बलात्कार झालाय की स्वत:च्या मनात दडलेलेच काहीतरी तिच्या वर्णनातून उमटतंय असे तिला वाटू लागते. त्यातच ती तीन वेगवेगळे जबाब देते. अखेरीस ‘मी खोटी तक्रार केली’ असे ती पोलिसांना सांगते. त्यामुळे त्या प्रकरणाचा तपास थांबतो. पण त्यातून तिचं भावनाविश्वच उद्ध्वस्त होते. दोन वर्षांनंतर अशाच प्रकारे आणखीन एका बलात्काराची नोंद होते. मोडस ऑपरेंडी तीच असते. पुरावाच सापडत नसतो. कसलाही मागमूस न ठेवणारी हा गुन्हेगार कोण असू शकतो, याचे कोडे तपास करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला पडते. त्याचवेळी दुसऱ्या प्रांतात आणखीन एका बलात्काराच्या घटनेत हीच मोडस ऑपरेंडी सापडते. दोन्हीकडच्या महिला पोलीस अधिकारी एकत्रितपणे काम करू  लागतात. त्यातून अनेक बारीकसारीक गोष्टी पुढे येतात. संगणकाच्या सहायाने खूप सारे बारकावे तपासले जातात. इतर यंत्रणाचीदेखील मदत घ्यावी लागते. इतर शोधकथांप्रमाणेच अखेरीस गुन्हेगार सापडतो.

तसे पाहिले तर एका सरळ रेषेत जाणारी ही कथा असे प्रथमदर्शनी वाटते. पण सीरिजकर्त्यांनी त्याचे अनेक पदर उलगडले आहेत. पहिल्या पीडितेच्या आयुष्यातील अनेक बाबी या केवळ बलात्काराची घटना न मांडता त्याच्या अवतीभोवतीचे जगदेखील उलगडतात. अमेरिकी कुटुंबव्यवस्था, त्यातील त्रुटी, तपासयंत्रणांची उदासीनता, वसतिगृहातील वातावरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बलात्कारितेचे भावनाविश्व. त्यानंतरच्या बलात्कारांचा शोध घेतानादेखील हा धागा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर महिला तपास अधिकाऱ्यांच्या कौटुंबिक आयुष्यातदेखील डोकावण्याचा प्रयत्न होतो. एक अधिकारी म्हणून एखाद्या गुन्ह्य़ाचा तपास करताना त्याच्या आजूबाजूच्या घटनांची पाश्र्वभूमीदेखील महत्त्वाची असते. दोन भिन्न स्वभावाचे अधिकारी जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्या कार्यशैलीचा परिणाम तपासावर होतो का? की ते एकत्रितपणे गुन्ह्य़ाच्या मुळापर्यंत जातात?

असे अनेक कंगोरे मांडल्यामुळे ही वेबसीरिज केवळ रहस्य उलगडणे इतपतच मर्यादित राहत नाही. किंबहुना, सीरिजकर्त्यांना रहस्य उलगडण्याबरोबरच इतर अनेक बाबी मांडण्यात अधिक स्वारस्य दिसते. सर्व यंत्रणा हाती असूनदेखील जेव्हा एखाद्या ठिकाणी येऊन तपास खुंटतो तेव्हाची जाणीव काय असते हेदेखील त्यामुळे दिसून येते. हल्ली बरीच माहिती एका क्लिकवर जरी उपलब्ध असली तरी त्या माहितीसाठय़ाचा उपयोग हुशारीने कसा करायचा हा मुद्दा यात महत्त्वाचा ठरतो. तपासाला कलाटणी देणारी घटना ही या सर्व माहितीसाठय़ाचा हुशारीने वापर करणे हीच आहे.

या सर्व तपासकथेबरोबरच आणखीन एक मुद्दा अगदी सहजपणे यातून मांडला आहे. बलात्कारानंतर भावनाविश्व जर गडबडले असले आणि त्याचा परिणाम रोजच्या कामावर होत असला तरी त्यात कुढत बसायचे की पुढे जायचे? या प्रश्नाचं उत्तर या मालिकेतील प्रत्येक पीडित महिला वेगवेगळ्या पद्धतीने देते. संधी मिळताच या सर्वातून बाहेर पडून स्वतंत्र आयुष्य सुरू करण्याचा मारीचा निर्णय म्हणून खूप वेगळा ठरतो. इतकेच नाही तर तपास अधिकाऱ्यानेदेखील एखाद्या गुन्ह्य़ाकडे कसे पाहावे याचेदेखील वेगळे पैलू दिसतात.

सत्यकथा असल्यामुळे कथेत पाणी न घालता अगदी थोडक्यातच हे सगळे मांडण्याचे काम सीरिजकर्त्यांनी केले आहे. इतर तपासकथांप्रमाणे सनसनाटीपणाला आवर घालून कथा पुढे सुरू ठेवल्यामुळे काही ठिकाणी खूपच संथपणा जाणवतो, पण तो एकूणच मांडणीला पूरक ठरतो. आठ भागांची ही मिनी वेबसीरिज जरूर पाहण्यासारखी आहे.