बॉलीवूडमधील तरूण फळीमध्ये अभिनेता अर्जुन कपूरच्या व्यक्तिमत्वाभोवती नेहमीच एक गूढ वलय राहिले आहे. अर्जुन इतरांपेक्षा नेहमीच कमी बोलतो, वैयक्तिक आयुष्यातील घटना, गोष्टींबाबत तर तो कधीच बोलायला तयार होत नाही. अर्जुनचे वडिल निर्माता बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी विवाह करून नवा संसार थाटला. त्याचे खूप खोल परिणाम त्याच्या मनावर आहेत. किंबहुना, त्यामुळेच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल तो नेहमीच मौन धरून असतो. मात्र, ‘टपाल’ चित्रपट पाहिल्यानंतर अर्जुनने कधी नव्हे ते आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. काका संजय कपूर हा आपल्याला सगळ्यात जवळचा होता आणि आजही आहे, असे अर्जुनने सांगितले.
अर्जुन अधूनमधून मराठी चित्रपट पाहतो, अशी माहितीही त्यानेच दिली. ‘टपाल’ हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी अर्जुन खास हजर होता त्याचे एकमेव कारण म्हणजे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारे लक्ष्मण उत्तेकर! हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजलेले सिनेमॅटोग्राफ र लक्ष्मण उत्तेकर यांनी नुकताच अर्जुनबरोबर ‘तेवर’ हा चित्रपट के ला होता. मात्र, उत्तेकर तर छुपे रुस्तम निघाले. त्यांच्यात इतका चांगला दिग्दर्शक लपला आहे याचा त्यांनी थांगपत्ताही लागू दिला नाही, अशी प्रतिक्रिया अर्जुनने दिली. ‘टपाल’ चित्रपटात मानवी नात्यांमधल्या भावभावना इतक्या गहिऱ्या पध्दतीने उतरल्या आहेत की त्याला स्वत:च्या अशा अलवार नात्यांची आठवण झाल्याचेही त्याने सांगितले.  आपल्याला आईवडिल असतातच. त्यांच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असते. मात्र, आईवडिलांपलीक डे जाऊनही असे काही जिव्हाळ्याच्या नात्यांचे बेट आपल्या आयुष्यात असते. माझ्या आयुष्यात असा एक माणून आहे तो म्हणजे माझा काका संजय कपूर. तो माझा काका असला तरी त्याच्याबरोबर आयुष्यातले इतके छान क्षण मी व्यतीत केले आहेत. माझ्यासाठी खरे म्हणजे माझे वडिल, माझा भाऊ, माझा मित्र असे सगळे काही तो एकटाच आहे, अशी भावना अर्जुनने व्यक्त केली आहे. याआधी त्याने आपल्या वडिलांबद्दल सूचक भाष्य केले होते आणि केवळ त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी जोडलेलो आहोत, असेही स्पष्ट केले होते.  मराठी चित्रपट सध्या चांगले चर्चेत आहेत आणि मुख्य म्हणजे या मराठी चित्रपटांमधून इतक्या वेगवेगळ्या पध्दतीचा आशय मांडलेला पहायला मिळतो, असे त्याने यावेळी सांगितले. चांगल्या चित्रपटाला भाषेचा अडसर कधीच येत नाही. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील चित्रपट आपल्या दर्जेदार आशयामुळे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांना योग्य तो प्रतिसादही मिळतो आहे, असे मत त्याने व्यक्त केले.