क्वांटिको गर्ल प्रियांका चोप्राची युनिसेफच्या ग्लोबल अॅम्बेसिडर पदी नियुक्ती झाल्याचं साऱ्यांनाच माहित आहे. प्रियांकादेखील तिच्या पदाचं भान राखत आपली जबाबदारी नीट पार पाडत आहे. विशेष म्हणजे प्रियांका जे काम करत आहे ते पाहून न्यूयॉर्कमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्नो फ्लेक बॉल’ या कार्यक्रमात तिला ‘डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन’ हा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामुळे तिच्या सन्मानात आणखी एक भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियांकाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

यूनिसेफ यूएसएने त्यांच्या ट्विटरवरुन प्रियांकाला पुरस्कार मिळाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर प्रियांकानेदेखील एक फोटो शेअर करत आभार मानले आहेत. ‘स्नो फ्लेक बॉल’ हा न्यूयॉर्कमधील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा असून यात यूनिसेफकडून मानवतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात.  ३ डिसेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

“स्नो फ्लेक बॉल’मध्ये ‘डॅनी काये ह्युमॅनिटेरियन’ पुरस्काराने मला सन्मानित करण्यासाठी मी यूनिसेफ यूएसएचे मनापासून आभार मानते. जगातील सगळ्या लहान मुलांसाठी त्यांच्या शांतता, स्वातंत्र आणि शिक्षण या अधिकारांसाठी यूनिसेफसोबत काम करणं हे माझ्यासाठी सारं काही आहे”, असं कॅप्शन प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. त्यासोबतच तिने यूनिसेफ यूएसएचे आभारही मानले आहेत.

दरम्यान, प्रियांका २००६ पासून यूनिसेफसाठी काम करत असून २०१० आणि २०१६ मध्ये तिला बाल अधिकारांसाठी राष्ट्रीय आणि जागतिक यूनिसेफ सदिच्छा दूत म्हणून निवडण्यात आलं आहे.