असा एखादा सुट्टीचा दिवस येतो जेव्हा आपण गजराने नाही तर बाहेर मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या आवाजामुळे अलगद जागे होतो आणि सहज खिडकीवरचा पडदा बाजूला सारून पावसाला ‘शुभ प्रभात’ म्हणून त्याचं स्वागत करतो. बाहेर कोसळणाऱ्या शुभ्र पाऊसधारांकडे बघत मनात सुरांच्या तारा आपोआप छेडल्या जातात आणि मग आपल्या मूडप्रमाणे मनाच्या पटलावर एक तर ‘लगी आज सावनकी..’चे नाही तर ‘सावन बरसें..तरसें दिल’ अशी चित्रपटांमधली कधी विरहाची, कधी रोमँटिक गाणी एकामागोग एक वाजत राहतात. पाऊस आणि चित्रपटांच्या गाण्यांचं एक अनोखं नातं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाने गीतकाराच्या स्वभावानुसार आणि संगीतकाराच्या नजाकतीनुसार पाऊस अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या मूडमधून खेळत राहतो, आपल्याला खेळवत राहतो.

पावसाची गाणी म्हटलं की, एका छत्रीतले राज क पूर आणि नर्गिस यांचं चित्र डोळ्यासमोर हटकून येतं आणि याला कोणतीही पिढी अपवाद नाही. संगीतकार शंकर-जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र यांचं लता आणि मन्ना डे यांच्या आवाजातील ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ हे गीत एरवीही सहज कुठे ना कुठे ऐकायला मिळतंच. पण पावसात मात्र ते प्रेमीजनांना आणखी रोमँटिक करून जातं. बाहेर ‘तो’ बेभान बरसत असताना हृदयात अशी गाणी एकामागोमाग एक वाजतात, अशा वेळी कुणी जवळचे जवळ असेल तर दुधात साखर, पण नसले तरी आपला आणि त्या अवीट गाण्यांचा सिलसिला सुखरूप सुरू होतो! पाऊसही अलगद आपल्याला बोट धरून ‘रेट्रो’ गाण्यांच्या मोहमयी जगात नेऊन सोडतो. जिथे गाण्याचा ठोका ओळखून ठेका निर्माण करणारे संगीतकार एस. डी. बर्मन आणि दुसरीकडे साहीर लुधियानवी, शैलेंद्र यांची परंपरा समर्थपणे पुढे नेणारे उर्दू शायर, गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांच्या ‘एक लडकी भिगी भागीसी’ या गाण्यात थोडासा अल्लड, अवखळ पावसाचं रूप आपल्याला ऐकायला मिळतं. गाण्यातून ऐकू येणारा आणि त्याच वेळी पडद्यावर दिसणारा किशोर कुमार यांचा खटय़ाळपणा आणि भिजलेली, गोंधळलेली मधुबाला यांच्यात सुरू असलेल्या अबोल संवादाला मजरूह सुलतानपुरी यांनी खटय़ाळ, मिश्कील भाव आपल्या गीतांतून जोडत हा पाऊस अनेक प्रेमी जीवांच्या मनात चिरंतन करून टाकला आहे. हिंदी चित्रपटसंगीतात लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने अनेक सुमधुर गाणी दिली आहेत. विलक्षण मेलडीने भारलेल्या या संगीतकार जोडीला त्यांच्याच तोडीचा, अतिशय साधेपणातही खूप काही सांगून जाणारा कवी लाभला. जे कारकीर्दीच्या सुरुवातीला सैन्यात होते, परंतु मनात कविता चिरंतन जपल्यामुळे भविष्यात सिद्धहस्त गीतकार म्हणून नावारूपास आले असे थोर कवी आनंद बक्षी. यांच्याबद्दल म्हणायचेच झाले तर, सामान्य माणसाला अगदी सहजपणे इंद्रधनुष्याची स्वप्नं दाखवणारा हा कवी होता. बक्षी यांच्या गीतात पाऊस नसला तरी ‘छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गयी’ हे गाणं ऐकताना पावसात ओसंडून नाचणारे राजेश खन्ना आणि मुमताज आपल्यालाही चिंब भिजवून टाकतात. कदाचित त्यांच्याच पावसाचे चार थेंब आपल्यावर उडाले असे वाटतानाच पाऊस हा गीतकाराच्या शब्दांतच असायला हवा असं नाही, हेही जाणवतं. त्या शब्दांना संगीताचे सूर असे काही झंकारून जातात की दिग्दर्शकालाही पावसाच्या धारांचं संगीत त्याला जोडण्याचा मोह आवरत नाही.

खिडकीच्या चौकटीला रेलून पावसाचे थेंब झेलत असंच एक अफलातून गाणं आपल्या समोर येतं आणि ते असते, ‘कजरा लागा के, गजरा सजाके’. या गाण्यामध्ये आधीच्या गाण्यातील स्वरसम्राज्ञीचा स्वर, आनंद बक्षी यांचे साधे परंतु मनाला भिडणारे शब्द आणि पुन्हा एकदा राजेश खन्ना – मुमताज यांचे पाऊस मीलन हे सोडून केवळ दोनच गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे पावसाच्या धारांमध्ये गाण्यातला रोमान्स किशोरदा आपल्या दिलखूश आवाजाने खुलवतात आणि दुसरं म्हणजे आर. डी. बर्मन यांचं संगीत पावसासारखंच मनामनात फेर धरून नाचत राहतं. आर. डी. बर्मन म्हणजे बंगालच्या रवींद्र संगीताच्या संस्कारापासून ते पाश्चिमात्त्य संगीताच्या ओढीपर्यंत ज्यांनी आयुष्यात प्रवास केला. त्या काळातल्या ‘तरुणांची धडकन’ असे ज्यांना आवर्जून म्हणता येईल असा संगीतकार. त्यांनी संगीत दिलेल्या या गाण्यात राजेश खन्ना – मुमताज ‘पाऊस’ अक्षरश: जगतायत. त्यांचं ते भिजणं नकळत आपलंही भिजणं होऊन जातं. पण आर. डीं.च्या गाण्यांमधून पाऊस वेगवेगळ्या मूडमधून बरसतो. तो जितका उडता तितकाच हळूवारपणेही भिडतो.. कदाचित त्यामागचं कारण हे त्या गाण्यांच्या शब्दांमध्ये दडलेलं असावं. म्हणूनच तर स्वप्नांत रमणारा परंतु तरीही जीवनाच्या तत्त्वज्ञानाशी त्याची सांगड घालणारा कवी-गीतकार म्हणजे कवी योगेश यांचे शब्द जेव्हा आर. डी.च्या संगीताशी जोडले जातात तेव्हा पाऊस ‘सावन’ बनून रिमझिमत राहतो. आर. डी. यांचे संगीत, दीदींचा स्वर आणि कवी योगेश यांचे शब्द असलेले ‘रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन’ हे गाणं कधीही कानावर आलं तरी आपण त्या मधाळ आवाजात तरंगत स्वप्नात शिरतो. या गाण्यात अमिताभ आणि मौसमी चटर्जीने घडवलेले त्याकाळातले मुंबई दर्शन आपल्याला काही काळ गुंतवून ठेवते. त्या दोघांत जुळत जाणारे बंध, रिमझिणारा पाऊस आपण त्या काळातल्या मुंबईसह अनुभवत जातो. आर.डीं.च्या संगीताने सजलेल्या ‘भीगी भीगी रातों में’ या राजेश खन्ना-झीनत अमानवर चित्रित झालेल्या गाण्यात तर पावसाला प्रणयी साज चढवला आहे. रेट्रो काळामधून हळूहळू मेट्रो काळाकडे सरकताना एवढय़ा प्रदीर्घ कारकीर्दीचा पल्ला गाठल्यानंतर आर. डीं.च्या संगीतातून पाऊस पुन्हा एकदा रिमझिम बरसतो. या वेळी त्यांच्या संगीताला शब्द लाभलेले असतात ते दर्जेदार, निखळ मनाचा गीतकार म्हणून लौकिक असलेल्या जावेद अख्तर यांचे. या दोन प्रतिभावंतांनी साकारलेलं ‘रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम’ हे गाणं म्हणजे कुठल्याही प्रेमात पडलेल्या व्यक्तीला त्या प्रेम-पाकात अधिक मुरवणारं ठरतं. अनिल कपूर आणि मनीषा कोईराला यांचा रोमान्स कुणीही पाहत राहील असाच दिग्दर्शित केला असला तरी खरी जादू आहे ती त्या गाण्याच्या सुरावटीत, अलवार शब्दांमध्ये हे कोणीही अमान्य करू शकणार नाही.

पाऊस-गाण्यांच्या या प्रवासात एका कलावंताचा उल्लेख करायलाच हवा; संगीत आणि काव्य दोन्ही स्वत:च्या प्रतिभेतून उमटवणाऱ्या कलावंतामध्ये एक कविता होती आणि कवितेलाही संगीताची सुगम साथ होती; आणि ते अद्वितीय नाव म्हणजे रवींद्र जैन! ‘वृष्टी पडे टापूर टिपूर’ हे ते गाणं.. संगीतकार आणि गीतकार या दोन भूमिकांतून भेटणारे रवींद्र जैन नेहमीच आपल्या गाण्यांतून रसिक जनांना सुखावत आले आहेत, रसिकांच्या मनात खोलवर डोकवायची ‘दृष्टी’ त्यांना लाभली होती असे म्हणायला काहीच हरकत नाही. हे गाणं ऐकताना कुणीही मनावरचा रेनकोट बाजूला काढतो आणि सुरेश वाडकर आणि हेमलता यांच्या स्वरांत मनसोक्त भिजून घेतो. आत्ताआतापर्यंत एका ठेक्यात बांधलेला पावसाचा गीतानुभव काही काळ मेंदूत रेंगाळत असतानाच कडकडाट होऊन विजेचा झटका बसावा तसे पुढचे पाऊस-गाणे कानात शिरते आणि आतापर्यंत सुरू असलेल्या शांत बाजाच्या गीतांना छेद देऊन काळजावर अधिराज्य करते. याला प्रमुख दोन कारणं असतात, त्या गाण्यातली स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचे एकत्रित रसायन आणि दुसरं म्हणजे आजच्या संगीतसृष्टीतले सोन्यासारखे संगीतकार बप्पी लहरी यांचं संगीत आणि अनजान या गीतकाराचे शब्द. ते गाणं असतं ‘आज रपट जैयो तो’! संगीतात पकडलेला ठेक्याचा ढाचा प्रत्येक कडव्यात सारखा जरी भासला तरी त्याची विविधता वळणावळणावर आढळून येते. पाऊस आतून बाहेर, बाहेरून आत थुईथुई नाचत असताना, स्मिता पाटील यांचे आठवणीतले अस्तित्व पुन:पुन्हा मनाच्या पटलावर दरवळून जाणार असते, ते जातेच!  हळूहळू पाऊस-गाण्यांचा काळ रेट्रोतून पूर्ण मेट्रोमध्ये येतो तेव्हा पाऊस-गाणी अधिक धीट होत गेलेली जाणवतात. अधिकाधिक चिंब होत जातात. ऐकण्याच्या जागा कमी कमी होत बघण्याच्या जागा वाढत जातात. कानाची जागा डोळे घेतात आणि कान शब्दांची पर्वा न करता, संगीतातल्या मेलडीची ओढ मनाला लावून न घेता ‘ढिच्चीक ढाच्चीक’च्या  सुरात फक्त स्वत:चे असणे धन्य करून घेतात. ‘पाऊस- प्रेमगीतांचा’ आता ‘रेन डान्स’ होतो. या ‘रेन-डान्स’मध्येही काही गाणी लक्षात राहणारी आहेत. यातली अनेक गाणी आमिर खान, अक्षय कुमार, शाहरूख खान आदी कलाकारांवर चित्रित झालेली आहेत. आणि ती गीतकार-संगीतकारापेक्षाही पावसात चिंब भिजून गाणाऱ्या नायिकांमुळे जास्त लक्षात राहतात. ‘देखो जरा देखों बरखा की झडी.’ म्हणत नाचणारा अक्षय कुमार, ‘टिप टिप बारीश शुरू हो गई’ म्हणत प्रेमाचा इजहार करणारा आमिर खान, ‘काटें नही कटतें’ म्हणत नाचणारी श्रीदेवी, ‘टिप टिप बरसा पानी’ म्हणत आग लावणारी रवीना ते अगदी पावसात ‘जो हाल दिल का’ म्हणत आपल्या मनाची अवस्था प्रियकराला सांगणारी सोनाली बेंद्रे अशा गाण्यांमधून पाऊस ऐकू येण्यापेक्षा तो पडद्यावर दिसणाराच जास्त लक्षात राहतो. आताशा चित्रपटांतून पावसाच्या गाण्यांनी दडीच मारली आहे. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी पुन्हा पुन्हा रेट्रो काळातच जावं लागतं. अगदी अलीकडच्या पावसाच्या गाण्यांची आठवण काढायची तर ‘बागी’ चित्रपटात ‘मै नाचू आज छम छम’ गाणारी श्रद्धा क पूर आठवते. इथे गीतकार-संगीतकार शोधण्याचे कष्ट घ्यावेसे वाटत नाहीत. श्रद्धावरच चित्रित झालेल्या ‘ये बारीश का मौसम’ या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटातील गाण्यातून पाऊस पुन्हा एकदा रोमँटिक झालेला ऐकायला मिळाला. तनिष्क बागची या तरुण गीतकाराच्या शब्दांतून आणि त्याच्याच संगीतातून उलगडलेला हा पाऊस सध्या तरी तरुणाईला वेड लावणारा ठरला आहे. मात्र पावसात डोळे हलकेच मिटून संगीताची जादू अनुभवायची तर एस. डी., शंकर जयकिशन, छढ, आर. डी. यांच्या संगीत-संमोहनात गुंतण्याशिवाय पर्याय नाही. शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी, योगेश यांच्या शब्दांची, अर्थाची किमया आपल्याला बंद डोळ्यांआडही थक्क करून टाकते, पुन्हा पुन्हा त्याच सुरांत चिंब भिजण्यासाठी भाग पाडते.