आपल्या सुमधूर आवाजाने प्रत्येत श्रोत्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता दीदी अर्था लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. आजवरच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी असंख्य चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या गोड आवाजामुळे आज लाखो गाणी अजरामर झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्याविषयी तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या वयैक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे आज त्यांच्या खऱ्या आयुष्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात.

लतादीदी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता असे नाव ठेवल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर १९४५ मध्ये दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले.

त्यानंतर संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी ‘मजबूर’ या सिनेमातील ‘दिल मेरा तोडा, कहीं का ना छोडा’ हे गाणे गायला सांगितले. हे गाणे बऱ्यापैकी लोकप्रिय झाले. दीदींनी एका मुलाखतीत गुलाम हैदर यांना आपले ‘गॉडफादर’ असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे दीदींनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटातही काम केलं होता.

आजपर्यंतच्या कारकीर्दीत लतादीदींनी ७ दशकांमध्ये १००० हून अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तर ३६ हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याशिवाय, १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.