समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टपणे आणि तितक्याच रोखठोकपणे मत मांडणाऱ्या दिग्दर्शक प्रवीण तरडे यावेळी अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी कलाकारांना अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे.

कोल्हापूर, सांगलीप्रमाणेच पुन्हा एकदा महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. त्यामुळे आपण साऱ्यांनी एकत्र येत अवकाळी पावसाचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्यासाठी शक्य तितकी मदत करायला हवी असं सांगितलं. सोबतच पीडित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी एक नवीन कल्पनाही यावेळी सांगितली.


प्रवीण तरडे यांनी अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कलाकारांना एक कल्पना सुचविली आहे. त्यांनी सुचविलेल्या कल्पनेप्रमाणे प्रत्येक कलाकाराने आपआपल्या जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयाला भेट देण्यास सांगितलं आहे. त्यासोबतच या कार्यालयात गेल्यानंतर अवकाळी पावसामुळे किती शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यांची भरपाई कशी करण्यात येणार आहे आणि तहसीलदार कार्यालयात तक्रार करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांशी येथील कर्मचारी कसे वागतात याचा अंदाज घ्यायचा आहे. सोबतच शक्य झाल्यास एक लाइव्हदेखील करायचं आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रवीण तरडे यांनी कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. येथील नागरिकांसाठी त्यांनी १६ ट्रक अन्नधान्य आणि पाळीव प्राण्यांसाठी २ ट्रक पेडिग्री पाठविली होती.