‘ ग्लोबल स्टार’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन निक जोनास डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. जोधपूरमधल्या उमेद भवन या आलिशान पॅलेसमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी प्रियांकाच्या कुटुंबातील निवडक मंडळी आणि जोनास कुटुंबीय उपस्थित होतं. १ डिसेंबरला ख्रिश्चन तर २ डिसेंबरला पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा स्वप्नवत सुंदर विवाहसोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याचे यापूर्वी न प्रकाशित झालेले काही फोटो समोर आले आहेत. प्रियांकाच्या फोटोग्राफर टीमनं हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो पारंपरिक भारतीय पद्धतीनं पार पडलेल्या विवाहसोहळ्यातले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसणार हे नक्की. प्रियांकानं आपल्या लग्नातील काही फोटोंचे हक्क एका मासिकाला विकले होते. या फोटोंसाठी मासिकानं कोट्यवधी रुपयेदेखील मोजले होते. तसेच या लग्नातील काही व्हिडिओ फुटेज वापरण्याचे हक्कही प्रियांका निकनं या मासिकाला दिले होते.