सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे नाव सर्वपरिचित आहे. पब्ज संस्कृतीवरील आपल्या धडक कारवाईने ढोबळे यांनी उच्चभ्रूंमध्ये मोठा दरारा निर्माण केला होता. कुणालाही न जुमानता कारवाई करण्याची त्यांची पद्धत जशी लोकप्रिय झाली तसे ते वादातही सापडले. हेच ढोबळे आता प्रथमच मोठय़ा पडद्यावर दिसणार आहेत. ‘द सॅडरडे नाइट’ या आगामी चित्रपटात ढोबळे यांची व्यक्तिरेखा दिसणार आहे. मुंंबईच्या नाइट क्लबवर ढोबळेंची चालणारी हॉकी स्टिक हा या चित्रपटाचा गाभा आहे.
वसंत ढोबळे यांनी समाजसेवा शाखेत असताना नियमबाह्य़, उशीरा चालणारे पब्ज, बार यांच्यावर कारवाई सुरू केली. अनैतिक धंदे चालणारे मसाज पार्लर, हुक्का पार्लर बंद केले. पहाटेपर्यंत धिंगाणा घालणाऱ्या पब्जवरील कारवाईने ते चर्चेत आले. धनदांडग्यांच्या मुलांवर कुठल्याही दडपणाला भीक न घालता त्यांनी कारवाई केली. त्यामुळे निर्माता दिग्दर्शक जयप्रकाश यांनी ढोबळेंच्या जीवनावर ‘द सॅटरडे नाइट’ हा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटात वसंत ढोबळेंच्या व्यक्तिरेखेस ‘विशाल ढोबळे’ हे नाव देण्यात आले आहे. आरिफ झकेरिया याने ढोबळे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.
यासंदर्भात जयप्रकाश यांनी सांगितले की, ढोबळे यांच्या कार्यपद्धतीवर हा चित्रपट असला तरी त्यांना नकारात्मक पद्धतीने रंगविण्यात आलेले नाही. ढोबळे जसे आहेत तसे या चित्रपटात साकारण्यात आलेले आहे. त्यांच्याबद्दल समाजाच्या एका वर्गात चीड आहे. परंतु सर्वसामान्यांना ढोबळे हिरो वाटतात. अनुषंगाने मुंबईतले रात्रीचे जीवनही चित्रपटात दाखविण्यात आलेले आहे. हा चित्रपट लो बजेट असला तरी तो संपूर्ण भारतभर प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अमन वर्मा, प्रशांत नारायणन, माही कंडोई, नाझ पटेल आदींच्याही भूमिका आहेत. ढोबळे यांच्यावर चित्रपट तयार करतांना निर्मात्यांनी ढोबळे यांची परवानगी घेतलेली नाही तसेच त्यांना चित्रपटही दाखविण्यात आलेला नाही. मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट किंवा चित्रपटाचा प्रोमो मी पाहिलेला नाही. माझ्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. माझी व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे, ते मला माहीत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जर काही आक्षेपार्ह असेल तर पुढील कारवाईचा विचार करेन
वसंत ढोबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त,

पोलिसांच्या जीवनावर चित्रपट
पोलिसांच्या जीवन आणि कार्यपद्धतीवर यापूर्वीही चित्रपट तयार झालेले आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या जीवनावर ‘अब तक छप्पन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर ‘मुंबई अटॅक २६/११’ या राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात राकेश मारिया यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. आगामी ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’मध्ये पहिले एन्काऊंटर करणारे इसाक बागवान यांची व्यक्तिरेखा दाखविण्यात आली आहे. तर ‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’मध्येही तत्कालीन पोलीस अधिकारी ए. ए. खान यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे.