सप्टेंबर महिन्यात बॉलिवूड आणि मराठीतील काही उल्लेखनीय चित्रपटांनंतर आता ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागलेली आहे. ऑक्टोबरमध्येही काही उल्लेखनीय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा आढावा आपण घेणार आहोत.

६ ऑक्टोबर २०१७

मराठी चित्रपट-
हलाल
शिवाजी पाटील दिग्दर्शित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजन खान यांची कथा असलेल्या या चित्रपटाने अनेक पुरस्कारही मिळवले आहेत.

डॉ. तात्या लहाने: अंगार पॉवर इज विदीन
मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. लहाने यांच्या भूमिकेत अभिनेता मकरंद अनासपुरे दिसणार असून, अलका कुबल लहानेंच्या आईची भूमिका साकारणार आहेत.

बॉलिवूड चित्रपट-
जुली २
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुली’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. ‘जुली २’च्या बोल्ड टीझरमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झालेली. यामध्ये राय लक्ष्मी, रती अग्निहोत्री, साहिल सलाठिया, आदित्य श्रीवास्तव, रवी किशन, पंकज त्रिपाठी आणि निशिकांत कामत यांच्या मुख्य भूमिका आहेत.

शेफ
अभिनेता सैफ अली खान यामध्ये शेफची (आचारी) भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट जॉन फेव्हर्यूने याच्या ‘शेफ’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. ‘शेफ’ चित्रपटाने अभिनेत्री पद्मप्रिया जनकिर्मन ही पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. यात ती सैफच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल.

हेट स्टोरी ४
‘हेट स्टोरी’ सीरीजमधला हा चौथा चित्रपट असून यामध्ये करण वाही आणि उर्वशी रौटेला यांची मुख्य भूमिका आहे. विक्रम भट्ट या चित्रपटाचे निर्माते आहेत.

८ ऑक्टोबर २०१७

बॉलिवूड चित्रपट-
कालाकांडी
अक्षत वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट एक डार्क कॉमेडी आहे. चित्रपटात सैफला अचानक कळते की त्याला कर्करोग झाले आणि त्यानंतर त्याचा स्वत:वरून ताबा सुटतो. सैफसोबत अभिनेत्री इशा तलवारसुद्धा या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. सैफशिवाय ‘कालाकांडी’ चित्रपटात दीपक डोबरियाल, विजय रज, कुणाल रॉय कपूर, सोबिता धुलिपला, अक्षय ओबेरॉय, इशा तलवार, अमायरा दस्तूरसुद्धा झळकणार आहेत.

१९ ऑक्टोबर २०१७

बॉलिवूड चित्रपट-
सिक्रेट सुपरस्टार
दंगल गर्ल म्हणून नावारुपास आलेली झायरा वसिम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. गायिका होण्यासाठीचा एका तरुणीचा संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.

२० ऑक्टोबर २०१७

बॉलिवूड चित्रपट-
गोलमाल अगेन
अजय देवगण, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, अरशद वारसी, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे अशा एकाहून एक सरस कलाकारांची भूमिका असलेला ‘गोलमाल अगेन’ हा कॉमेडी चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. ‘गोलमाल’ चित्रपटाच्या आधीच्या तीन भागांप्रमाणेच हाही भाग मनोरंजनाने परिपूर्ण असेल यात काही शंका नाही.

२७ ऑक्टोबर २०१७

मराठी चित्रपट-
फास्टर फेणे
रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अमेय वाघ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजलं होतं. ‘बनेश’ उर्फ ‘फास्टर फेणे’च्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. त्याच ‘बनेश’ची भूमिका अमेय साकारणार आहे.

बॉलिवूड चित्रपट-
जिया और जिया
बॉलिवूडच्या स्त्रीप्रधान चित्रपटांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. कल्की कोचलीन आणि रिचा चड्ढा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.