News Flash

शिवकालीन शिलेदार चमकणार ‘फर्जंद’मध्ये

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अनेक शिलेदारांचं मोलाचं योगदान आहे

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं होतं. असंख्य मावळ्यांच्या शौर्याने आणि त्यागाने स्वराज्य स्थापन झाले. यापैकीच एक असलेल्या ‘कोंडाजी फर्जंद’ या शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानांमधील आतापर्यंत समोर न आलेल्या अनेक लढवय्या व्यक्तिरेखा समोर येणार आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेला ‘फर्जंद’ १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असून संदीप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार सहनिर्माते आहेत.

या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी इतिहासाच्या पानांत लुप्त झालेल्या अनेक महान व्यक्तिरेखांना ‘फर्जंद’ या सिनेमाद्वारे समोर आणण्याचं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि कोंडाजी फर्जंद या नायकाच्या भूमिकेत अंकित मोहनला सादर करताना इतर व्यक्तिरेखांसाठीही दिग्पालने दिग्गज कलाकारांची निवड केली आहे.

या सिनेमात अभिनेता अजय पुरकर यांनी मोत्याजी मामा साकारले आहेत, तर आस्ताद काळे गुंडोजी झालाय… राहुल मेहेंदळे अनाजी पंतांच्या भूमिकेत दिसणार असून, राजन भिसे हिरोजी इंदुलकर साकारत आहेत. हरीश दुधाडे यांनी गणोजीची व्यक्तिरेखा साकाली असून, प्रवीण तरडे यांनी मारत्या रामोशी ही महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. यासोबतच अंशुमन विचारेने भिकाजीच्या भूमिकेत रंग भरला आहे. या सर्व व्यक्तिरेखा प्रभावीपणे पडद्यावर सादर व्हाव्यात या उद्देशाने दिग्पालने मराठीतील आघाडीच्या कलाकारांची निवड केली आहे.

याबाबत बोलताना दिग्पाल म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अनेक शिलेदारांचं मोलाचं योगदान आहे. मोत्याजी मामा, गुंडोजी, अनाजी पंत, हिरोजी इंदुलकर, गणोजी, मारत्या रामोशी, भिकाजी यांचाही त्यात समावेश आहे. ‘फर्जंद’ या सिनेमात ‘कोंडाजी फर्जंद’ याची कथा असली तरी कोंडाजीप्रमाणेच स्वराज्याच्या जडणघडणीत सहभागी असलेल्या तत्कालीन नायकांचं कार्य समोर यावं या उद्देशाने त्यांच्यावर फोकस केला आहे. यांच्या भूमिका फार मोठ्या नसल्या तरी त्या प्रभावीपणे मनावर ठसतील याची दक्षता घेण्यात आल्याचं दिग्पाल म्हणाला. नितीन चंद्रकांत देसाई यांनी चित्रपटाचे कलादिग्दर्शन केलं आहे, तर निखील लांजेकर यांनी ध्वनीलेखनाचं काम पाहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 10:37 pm

Web Title: upcoming marathi movie farzand characters are special
Next Stories
1 स्टार प्रवाहवर येतोय ‘वेलडन भाल्या’
2 असा असेल बिग बॉस मराठीचा आजचा दिवस
3 …जेव्हा रणबीर दीपिकाला म्हणाला, ‘आजही करतो प्रेम’
Just Now!
X