मराठी चित्रपटसृष्टी आणि विनोदी संहिता हे समीकरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरली आहे. आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक विनोदीपटांची निर्मिती झाली आहे. यामध्येच आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसविणारा ‘झोलझाल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्ट प्रदर्शित झालं आहे.

मानसकुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ हा चित्रपट विनोदी अंगाने रेखाटण्यात आला असून त्यातून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एक महिला आणि एक पुरुष दिसत आहे. या फोटोमध्ये असलेल्या व्यक्तींचा चेहरा दाखविण्यात आला नसून त्यांच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींवरुन या चित्रपटामध्ये नक्कीच काहीतरी धमाकेदार दाखविण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे.

पोस्टरमध्ये दिसणारी पैशाची बॅग, नेत्याची टोपी, पोलिसांची टोपी, बंदूक या छोट्या गोष्टींमुळे डोक्यात मोठा गोंधळ निर्माण होत आहे. मात्र हा ‘झोल’ नक्की कोण करतोय? कसला ‘झोल’ आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला १ मे ला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहे. ‘झोलझाल’

दरम्यान, या चित्रपटात मल्टीस्टार कास्ट झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापतरी कोणत्याही भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आलेला नाही. या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली आहे