19 October 2019

News Flash

सामाजिक भान जपणारे नाटक : ‘मी.. माझे.. मला’

विघ्नेश जोशी, विजय गोखले, किशोर सावंत, विलास गुर्जर, सुरेखा कुडची, हेमांगी राव आणि रोहित मोहिते यांच्या या नाटकात भूमिका आहेत.

'मी माझे मला'

आपल्या आत्मकेंद्रित वृत्तीच्याही पलीकडे जाऊन, आपण समाजाचे काही देणे लागतो असा सुसंस्कार करणारे ‘मी.. माझे.. मला’ हे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे. आजच्या व्यवहारी जगातही नात्यांना किंमत असते, याची जाणीव हे नाटक करून देते. येत्या २१ एप्रिल रोजी गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

स्वतःची मुले असूनही, आई-वडिलांना आश्रितासारखे जगावे लागते याची बोचरी जाणीव माझ्या मनात होती. हा मुद्दा समाजासमोर येणे आवश्यक वाटल्याने आणि आनंद म्हसवेकर यांच्या लेखनात मला हा मुद्दा स्पष्ट दिसल्याने मी या नाटकाची निर्मिती करायची ठरवली, असे मनोगत याविषयी बोलताना निर्माते किशोर सावंत व्यक्त करतात.

धकाधकीच्या आयुष्यात माणसाला दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळच उरलेला नाही. मात्र प्रत्येकाने स्वतःपलीकडे बघणे आवश्यक आहे. इतरांना किंवा समाजाला आपण काही देणे लागतो हे भान प्रत्येकाने राखलेच पाहिजे. स्वतःपलीकडे जाणारे, सामाजिक भान जपणारे हे नाटक आहे, असे मत या नाटकाचे दिग्दर्शक विजय गोखले मांडतात.

सध्या वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे. हीच आपली कौटुंबिक प्रगती आहे का, असा प्रश्न मला पडला होता. या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या नाटकातून केला आहे. वृद्धापकाळात आपल्याला मुलांनी सांभाळावे यासाठी या मंडळींना कोर्टात जावे लागते, ही आपल्या संस्कृतीची व संस्कारांची हार आहे असे मला वाटते, असे या नाटकाचे लेखक आनंद म्हसवेकर या नाटकाबाबत संवाद साधताना स्पष्ट करतात.

किशोर सावंत आणि विवेक नाईक यांच्या ‘किवी प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, विजय गोखले यांनी दिग्दर्शन केले आहे. विघ्नेश जोशी, विजय गोखले, किशोर सावंत, विलास गुर्जर, सुरेखा कुडची, हेमांगी राव आणि रोहित मोहिते यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अनिकेत शुभम यांचे संगीत, देवाशिष भरवडे यांचे नेपथ्य, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. या नाटकाचे व्यवस्थापन प्रवीण दळवी सांभाळत आहेत. सध्या या नाटकाच्या तालमी उत्साहात रंगल्या आहेत.

First Published on April 15, 2019 5:48 pm

Web Title: upcoming marathi play mi majhe mala on social responsibility