एखाद्या आठवडय़ात चित्रपट असूनही तो सुना सुनाच वाटतो तशी अवस्था आजची आहे. नाही म्हणायला मराठीतले दोन, हिंदीतला एक आणि हॉलीवूडचा एक असे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तरी त्या चित्रपटांची फारशी चर्चा झाली नसल्याने असेल, फारसा उत्साह दिसत नाही. उलट सगळं लक्ष आहे ते पुढच्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या ‘टय़ूबलाइट’कडे.. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात ‘टय़ूबलाइट’चा प्रकाश पडेर्प्यत या आठवडय़ात जे आहे त्यावर रसिक प्रेक्षकांना समाधान मानावे लागणार आहे.

बँकचोर

यशराज फिल्म्स आणि रितेश देशमुखचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत होता. रितेशचा या चित्रपटात प्रवेश होण्याआधी ही भूमिका कपिल शर्माच्या नावावर लिहिली गेली होती. मात्र कपिल आणि यशराज वादात ही भूमिका रितेशकडे गेली. या चित्रपटाची निर्मिती आशीष पाटील यांची आहे तर दिग्दर्शन बम्पी यांचे आहे. विनोदी शैलीतील कथा असलेल्या या चित्रपटात रितेशबरोबर विवेक ओबेरॉय सीबीआय अधिकाऱ्याच्या मुख्य भूमिकेत आहे. त्यातल्या त्यात विनोदी आणि हलकाफुलका चित्रपट असल्याने त्याला प्रेक्षकपसंती मिळण्याची शक्यता आहे.

टीटीएमएम’ (तुझं तू माझं मी)

‘तुझं तू माझं मी’ या सरळ नावाचे ‘टीटीएमएम’ असे आडवळणाने छोटेखानी नामाभिधान करून प्रदर्शित झालेला हा चित्रपट कौटुंबिक ड्रामा आहे. साधारण महिन्याभराच्या आत ललित प्रभाकर दुसऱ्यांदा हिरो म्हणून प्रेक्षकांसमोर येतो आहे. ललित आणि नेहा याआधी ‘झी टॉकीज’च्या शोच्या निमित्ताने एकत्र आले होते. मात्र ही जोडी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करते आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित हा चित्रपट तरुणाईचा प्रेम आणि लग्न या विषयातील गोंधळच पुन्हा रुपेरी पडद्यावर मांडणार आहे.

माचीवरला बुधा

गो. नी. दांडेकर यांच्या ‘माचीवरला बुधा’ या कोदंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन विजयदत्त यांनी केले आहे. याआधी गो. नी. दांडेकरांच्या ‘जैत रे जैत’ आणि ‘पवनाकाठचा धोंडी’ या दोन कादंबऱ्या चित्रपटरूपात आल्या आहेत. ‘माचीवरला बुधा’ ही त्यांना सर्वात जवळची कादंबरी होती. या चित्रपटात ‘बुधा’ ही मुख्य व्यक्तिरेखा अभिनेता सुहास पळशीकर यांनी साकारली आहे. चित्रपटासाठी प्रताप गंगावणे यांनी पटकथा लिहिली आहे. कादंबरीवरच्या चित्रपटांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे शिवाय गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवरचा चित्रपट म्हणून त्याविषयी जास्त उत्सुकता आहे.

रफ नाइट

‘हँगओव्हर’ या चित्रपटाची आठवण यावी अशी या चित्रपटाची कथा आहे. डार्क कॉमेडी प्रकारातील या चित्रपटात पाच मैत्रिणींची कथा रंगवण्यात आली आहे. महाविद्यालयीन शिक्षण संपवून आपापल्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेल्या पाच मैत्रिणी दहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र भेटतात. आणि मयामीमध्ये मोठी बॅचलर पार्टी करायचा निर्णय घेतात. त्यांच्या या जोरदार पार्टीच्या रात्रीत काय घडते याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट ल्युसिया अ‍ॅनिलोने दिग्दर्शित केला असून तिचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. ‘माव्‍‌र्हल’च्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’मधून ‘ब्लॅक विडो’ म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉक्सऑफिस

  • राबता – १९.४५ कोटी
  • बहेन होगी तेरी – १.८५ कोटी
  • द ममी – १२.५ कोटी
  • वंडर वुमन- १७.५४ कोटी