एकीकडे देश कोरोनाच्या संकटाशी दोन हात करतोय, तर दुसरीकडे भविष्यात करोनाची तिसरी लाट दरवाजा ठोठावतेय. करोना महामारीने आतापर्यंत हजारों लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या आहेत. यात बॉलिवूड असो किंवा मग छोटा पडदा, असे अनेक कलाकार आहेत, जे करोनामुळे घरीचं आहेत. त्यांच्या शूटिंग अडकून पडल्या आहेत. त्यामुळे हातात काम नसल्यामुळे कलाकारांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. असंच काहीसं झालंय ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिच्या सोबत.

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती स्वतःला ‘बेरोजगार’ म्हटलंय. नुकतंच तिला मुंबईतल्या जुहू इथे स्पॉट करण्यात आलं. त्यावेळी माध्यमकर्मींनी तिला तिच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल प्रश्न केला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सध्या तर करोना काळ सुरूये…एकदा हा कठिण काळ संपला की सगळ्यांनाच कामं मिळून जातील, तसंच मलाही मिळेल…सध्या मी बेरोजगार आहे.”

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री फातिमा सना शेखला करोना झाला होता. त्यानंतर तिने स्वतःला घरी आयसोलेट करून घेतलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर तिने करोनावर मात सुद्धा केली.

९० च्या दशकातील सुपरहिट फिल्म ‘चाची ४२०’ मधून बालकलाकाराची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी फातिमा गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘अजीब दास्तान्स’ चित्रपटामुळे बरीत चर्चेत आली आहे. २०१६ साली आमिर खानच्या दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर तिने लोकप्रियतेचं शिखर गाठण्यास सुरवात केली. त्यानंतर ती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’, ‘सूरज पे मंगल भारी’ आणि ‘लूडो’ मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

स्वतःच्या बेरोजगारीवर बोलताना फातिमा सना शेख म्हणाली, “सगळ्या चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना संपर्क करण्यात मला कोणताच संकोच वाटत नाही. मी उपलब्ध आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी सतत त्यांना आठवण करून देत असते. कधी कधी लोक कास्टिंगमध्ये आम्ही सुद्धा कलाकार आहोत हे विसरून जातात.”