|| पंकज भोसले

नायकाला अघोरी सूड घेण्यास उद्युक्त करणारे अत्यंत निवडक फॉर्म्युले जगभरातल्या सिनेमामध्ये आहेत. नायिकेवर अत्याचार किंवा तिची हत्या करणाऱ्या खलनायकाचा महत्प्रयासाने सूड घेणाऱ्या नायकांनी दाक्षिणात्य आणि बॉलीवूडच्या प्रेक्षकांना देवरूपी आदर्श दिले. त्या फॉर्म्युल्यात अंमळ बदल म्हणून मिथुन चक्रवर्ती अभिनित बहुतांश सिनेमांत त्याच्या लहान बहिणीची व्यक्तिरेखा असे. उद्दाम नराधमांचे सावज म्हणूनच जन्माला आलेल्या या व्यक्तिरेखेच्या सरणावर नायकाची पाश्र्वसंगीतमय शपथ चालू होई. त्यानंतरचा सिनेमा हाणामारीच्या चढत्या-उतरत्या क्रमात बदल करून चित्रपटयज्ञ पुरा होई. हॉलीवूडमधल्या मेमेण्टो ते बॉलीवूडच्या गझनीपर्यंतच्या नायकांच्या एकवळणी सुडाच्या फॉर्म्युल्याला भविष्यातील तंत्रमय जगताचा आधार घेऊन बेतलेला एक उत्तम चित्रपट सिनेवर्तुळात सध्या गाजतोय. ‘अपग्रेड’ हे त्याचे शीर्षक अनेकार्थाने योग्य असल्याचे दर्शवणारा हा चित्रपट आहे. यातल्या वातावरणापासून ते हाणामारीपर्यंतच्या सगळ्या संकल्पना या फॉर्म्युल्याला अद्ययावत करणाऱ्या असल्याने प्रेक्षकांना हा मनोरंजनासोबत चांगला चकवा देणारा चित्रपट ठरू शकतो.

‘अपग्रेड’मध्ये भविष्यातील साल सांगितले नाही, तरी मानवाचे आयुष्य संगणकाने पूर्णत: व्यापलेले आणि आत्तापेक्षा अधिक सुकर बनविलेले दिसते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्या ऑफिसयुक्त घरामध्ये एका गाडीवर तांत्रिक संस्कार करणारा ग्रे ट्रेस (लोगन मार्शल-ग्रीन) दिसतो. थोडय़ा वेळात अतिअत्याधुनिक स्वयंचलित गाडीतून त्याची पत्नी आशा (मॅलिनी व्हॅलेजो) घरी दाखल होते. आजच्या स्मार्ट डिव्हाइसच्या शेकडोपट पुढारलेले व्हर्शन्स असलेली घरातील यंत्रणा आणि त्यांच्याशी या दाम्पत्याचा चाललेल्या संवादातूनच या मानवी प्रगतावस्थेची कल्पना करून दिली जाते.

ग्रे याला आपल्या गॅरेजमधून गाडी तिच्या मालकाजवळ सोडायची असल्याने, तो आपल्या पत्नीला त्या मालकाचे विलक्षण घर पाहण्यासाठी नेतो. एका संगणक शास्त्रज्ञाचे हे निसर्गावर संपूर्णपणे नियंत्रण केलेले घर पाहून आणि त्याने केलेल्या संशोधनाची ओझरती झलक घेऊन हे दाम्पत्य घरी परतणार असते. आपल्या स्वयंचलित गाडीला आज्ञावली देऊन गाडीतून सुखाने प्रवास करीत असतानाच त्यांच्या गाडीचे स्वत:वरील नियंत्रण तुटते आणि गाडी अपघात होऊन एका उजाड वस्तीत दाखल होते. तेथे आपल्या शरीरातच बंदुकी बसविलेल्या व्यक्तींकडून आशाची हत्या होते आणि ग्रे शरीराने  पूर्णपणे जायबंदी होतो.

शहरभर वावरणाऱ्या सव्‍‌र्हिलन्स ड्रोन्समधून हत्येची घटना कैद होते, मात्र आजच्या पोलिसांच्या शेकडोपट अद्ययावत असलेल्या सुरक्षा यंत्रणांना आरोपी सापडत नाहीत.

एक दिवस शास्त्रज्ञ ग्रे याला भेटायला येतो. जायबंदी व्यक्तीला क्षणार्धात सक्षम आणि यंत्रमानवापेक्षा ताकदवान बनविणारा संगणकीय तुकडा (कॉम्प्युटर चिप) त्याने विकसित केलेला असतो. गोपनीयतेच्या अटीवर हा शास्त्रज्ञ ग्रे याच्या शरीरात तो तुकडा जोडतो. शेकडो अश्वशक्तीचे बळ लाभलेला ग्रे पारंपरिक सुडाची आपल्या ओळखीची गोष्ट अपारंपरिक वाटेने मांडण्यास तयार होतो.

इथले जगच पूर्णपणे तंत्राने विकसित झालेले आहे. घरातील टेबल, ओटे आणि भिंतीदेखील प्रसंगी टीव्ही-मोबाइलचे काम करताना दिसतात. खलनायकांजवळ बंदूक हातात नाही, तर त्यांच्या धमन्यांमध्ये बसविलेल्या असतात. समोरच्यावर हल्ला करण्याचे त्यांचे तंत्र पूर्णपणे वेगळे असून त्यांच्या शरीरावरही संगणकीय तुकडय़ांचा मोठा प्रभाव दिसतो. परिणामी प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्याची अद्वितीय शक्ती त्यांच्याकडेही दिसते.

ग्रे याच्या शरीरामध्ये सूडाग्नी पूर्ण करण्याचे इंधन भरणारी यंत्रणा त्याच्या मेंदूवरही नियंत्रण करून त्याच्याशी संवाद साधू लागते आणि त्याच्या सूडनाटय़ाला धार यायला लागते. एकेक करीत तो पत्नीच्या हत्याऱ्यांचा खात्मा करू लागतो; पण सूड पूर्ण होतानाच आणखी नवी रहस्ये त्याला छळण्यासाठी दाखल होतात. प्राप्त झालेल्या असामान्य शक्तीद्वारेही तो त्यांना भेदण्यास असमर्थ ठरू लागतो.

अत्यंत कमी बजेटमध्ये सुसज्ज चित्रपट बनविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ली व्हॅनेल या दिग्दर्शकाने ‘अपग्रेड’मध्येही आपले वैशिष्टय़पूर्ण कौशल्य राबविले आहे. इथली हाणामारी, गाडय़ांचा पाठलाग आणि अत्यंत विकसित शहरातील वातावरण नेत्रदीपक आहे. अगदी ‘मेट्रिक्स’मधील काही दृश्यांची आठवण करून देणारे काही अत्याकर्षक प्रसंग आहेत.

वास्तवापेक्षा अधिक इथल्या लोकांचे जगणे आभासी जगताशी पूर्णपणे जोडलेले असल्याने चित्रपटाच्या शेवटाकडे उत्तम चकवा ठेवला आहे. तो अनुभवच चित्रपटाची गंमत अधिक फुलविणारा आहे. अतिओळखीच्या फॉर्म्युल्याला अद्ययावत करून प्रेक्षकांनाही अपग्रेड करण्याचा या चित्रपटाचा हेतू आजच्या विज्ञानपटांपेक्षा पूर्णपणे भिन्न आणि कौतुकास्पद आहे.